— अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

बांदा गवळीटेंब ग्रामस्थांचा निर्णय

बांदा l प्रतिनिधी :     बांदा गवळीटेंब येथील रस्त्याचे मंजूर काम रखडल्याने १५ लाखांचा निधी परत गेला. याला बांदा ग्रामपंचायत, सावंतवाडी गटविकास अधिकारी जबाबदार आहेत. रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी यापूर्वी उपोषणही छेडले होते. परंतु अधिकाऱ्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिली. पावसाळ्यात रस्त्यावर निर्माण होणारी चिखलमय स्थिती लक्षात घेता रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी बांदा गवळीटेंब ग्रामस्थ सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडणार. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत सुमारे 500 मतदार मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे लेखी निवेदन ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार यांना सादर केले.

 

बांदा – गवळीटेंब रस्त्याच्या कामास जानेवारी २०२२ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. परंतु दोघा नागरिकांकडून कामास अडथळा निर्माण झाला. रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार, उपोषण करण्यात आले. परंतु प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रस्त्यासाठी मंजूर असलेला १४ लाख ९९ हजार ६३६ रुपयांचा निधी परत गेला. ठोस कार्यवाही न केल्याने याला प्रशासनच जबाबदार असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

पावसाळ्यात रस्त्यावर चिखलमय स्थिती असल्याने वाहतूक करताना ग्रामस्थ, शाळकरी मुले, वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना पायी चालण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम सुरू न केल्यास १ मे रोजी उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. गवळीटेंब येथील शांताराम परब, सहदेव नाईक, तुळशीदास कविटकर, दिगंबर चव्हाण, रामदास हुमरसकर, लक्ष्मण केरीकर, अजय परब, श्रीराम पेडणेकर, स्नेहलता हुमरसकर, सखाराम वराडकर यांच्यासह ८६ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.