मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्ग तसेच मालवण शहर परिसरातील विविध मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.
किल्ले सिंधुदुर्ग येथे राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त किल्ल्यातील रहिवाशांसोबतच मालवणातील भाविकांनी गर्दी केली होती. शिवराजेश्वर मंदिरात हा सोहळा पार पडला. यावेळी ह. भ. प श्री. परुळेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर पालखी सोहळा पार पडला. यावेळी राम नामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रामनवमी उत्सवानिमित्त रात्री किल्ल्यावर चाकरमान्यांच्या दोन अंकी विनोदाच्या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
तारकर्ली येथील महापुरुष मंदिर, शहरातील भरड येथील दत्तमंदिर, गवंडीवाडा येथील राम मंदिर, मेढा येथील राम मंदिर, बसस्थानक येथील राम मंदिर तसेच तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम जन्मोत्सवाच्या गीतांनी संपूर्ण परिसर राममय बनला होता.












