शिक्षक भरती 2022 मधील शिफारस प्राप्त उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश मिळावेत.

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

शिक्षक भरती 2022 मधील शिफारस प्राप्त उमेदवारांना तातडीने नियुक्ती आदेश मिळावेत.अशी मागणी जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्याकडे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनात या नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनी असे नमूद केले आहे की,आम्ही पवित्र प्रणाली मार्फत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी शिफारस झालेले सर्व उमेदवार या निवेदनादवारे आपणांस पुन्हा एकदा आम्हांला तातडीने नियुक्ती आदेश द्यावेत अशी विनंती करत आहोत.

शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी लोकसभा मतदान झालेल्या दुस-या दिवसापासून त्या त्या जिल्हयात प्रत्यक्ष नियुक्ती प्रक्रिया करण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना कळविले आहे. तसेच सुमोटो याचिकेनुसार सदरील भरती प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने कालमर्यादेत राबविण्यात यावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे.

पवित्र पोर्टलवर दि. 25/02/2024 रोजी निवडीची शिफारस यादी प्रसिदध झाल्यापासून आम्ही आजपर्यंत वेळोवेळी प्रशासनास संपूर्ण सहकार्य केलेले आहे. तसेच इतर ब-याच जिल्हा परिषदांनी शिफारस प्राप्त उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती आदेश यापूर्वीच दिले आहेत. जि.प.हिंगोली येथे देखील 14/05/2024 रोजी समुपदेशन झाले. अशी सर्वत्र परिस्थिती असताना मात्र आजपर्यंत नियुक्ती आदेशाच्या प्रतिक्षेत आहोत.

केंद्रीय निवडणूक आयोग यांनी देखील भरतीप्रक्रिया या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश असल्याकारणाने विदयार्थीहित लक्षात घेवून सदरील भरती प्रक्रिया राबविण्यास विशेष परवानगी दिलेली आहे. अशा परिस्थितीत देखील अदयाप नियुक्ती आदेश प्राप्त न झाल्यामुळे आम्ही सर्व उमेदवार मात्र होत असलेल्या मानसिक मनस्तापामुळे प्रचंड नैराश्यग्रस्त झालेलो आहोत. तसेच आमच्यापैकी बरेच उमेदवार आपली निवड झाली असल्यामुळे हाती असलेला रोजगार सोडून नियुक्ती आदेशाची वाट पाहत असल्याकारणाने त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, अशी भीषण परिस्थिती आहे, ही बाब देखील आम्ही आपल्यासमोर प्रकर्षाने नमुद करत आहोत. वरील आमच्या सर्व परिस्थितीचा आपण सहानुभूतिपूर्वक विचार करुन या पत्राची तातडीने अंमलबजावणी करुन आमच्या नियुक्ती संदर्भातील समुपदेशनाचा कार्यक्रम तातडीने प्रसिदध करुन नियुक्ती आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे लेखी निवेदनावर योगिता कोळसुलकर, लक्मण गोसावी, स्वप्नील चौगले तारामती गोसावी, सौ. अनिता पाटील,रुपाली नावळे, शिवलीला निडसोसी, प्रगती कदम ,माधवी सावंत आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.