वाफोली श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण वर्धापनदिन २३ मे रोजी

बांदा : प्रतिनिधी

वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिर कलशारोहण सहावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार २३ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

     यानिमित्त सकाळी ८ वा. गणपती पूजन, प्रायश्चित्त विधी, देवतांना नारळ – विडे, पुण्याहवाचन, प्रधानदेवता स्थापन पूजन, श्रीसुक्त जपाभिषेक, देवता होमहवन, कुमारिका पूजन, कुंकूमार्चन विधी, बलिदान, पूर्णाहुती आदी धार्मिक कार्यक्रम होतील. दुपारी महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद होईल.

सायंकाळी ६ वा. स्थानिक ग्रामस्थांची सुश्राव्य भजने, रात्री १० वा. वालावलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा “अघोरी शंकर” हा नाट्य प्रयोग होणार आहे. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई व समस्त वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.