कोदवली येथील नवीन धरण हे राजकिय गाजर-हनिफ मुसा काझी

निधीच द्यायचा असेल तर शिळजॅकवेलकडून समांतर जलावाहिनीसाठी द्या
धरणाच्या कामाच्या चौकशीसाठी पालकमंत्र्यांची भेट घेणार

राजापूर | प्रतिनिधी : गेली कित्येक वर्षे राजापूरकरांना कोदवली येथील नवीन धरणाचे गाजर दाखवून २४ तास पाणीपुरवठयाचे आश्वासन दिले जात आहे. मात्र अजून दहा कोटी रूपये जरी खर्च केले तरी राजापूर शहरवासीयांना दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उद्योजक किरण सामंत यांना राजापूरकरांना पाणी द्यायचे असेल तर या धरणाऐवजी शिळ जॅकवेलकडून समातंर पाणीपुरवठा वाहिनीसाठी निधी द्यावा आणि ते काम मार्गी लावावे अशी मागणी राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली आहे.

या धरणाच्या कामातच पाणी मुरत असून या झालेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी एक शिष्टमंडळ पालकमंत्री ना. उदय सामंत व किरण सामंत यांची भेट घेऊन पुराव्यासह आपली कैफियत मांडणार असल्याचेही काझी यांनी जाहिर केले आहे.

काझी यांच्या या मागणीमुळे आता पुन्हा एकदा कोदवली धरणाच्या कामाचा आणि राजापूरातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. तर धरणाच्या या रखडलेल्या व वाढलेल्या कामाचे नक्की गौंडबाल काय असाही सवाल आता शहरवासीयांतुन उपस्थित केला जात आहे.

पावसाळयात पूर आणि उन्हाळयात पाणीटंचाई अशी राजापूरची अवस्था आहे. राजापूर शहराच्या चारही बाजुला पाणी असूनही राजापूरकरांना उन्हाळयात पाणी पाणी करावे लागले. आजही आंम्ही राजापूरकर हे १४० वर्ष अखंडीतपणे नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाण्यावरच अवलंबून आहोत. नगर परिषदेच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकीत राजापूरकरांना २४ तास पाणीपुरवठयाचे आश्वासन दिले जाते, मात्र ते प्रत्यक्षात पुर्ण काही होत नाही अशी राजापूरकरांची अवस्था असल्याचे काझी यांनी सांगितले.

कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या वरच्या बाजुला नवीन धरणाचा प्रस्ताव झाला व हे कामही सुरू झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दहा कोटीचा निधीही दिला. गेली तीन वर्षे या धरणाचे काम सुरू आहे. आता या धरणाच्या कामाला निधी अपुरा पडला असल्याने काम ठप्प आहे. आणखी सात कोटीच्या निधीची आवश्यकता असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. अशा प्रकारे जर शहर वासीयांना अखंडीत २४ तास पाणीपुरवठा करायचा होता तर मग धरणाच्या कामाचा परिपुर्ण प्रस्ताव का पाठविला नाही असा खडा सवाल काझी यांनी उपस्थित केला आहे. यात तांत्रिक बाबी का तपासल्या गेल्या नाहीत, नंतर काम कसे काय वाढले, यावर नियंत्रण कोणाचे असे प्रश्न काझी यांनी उपस्थित केले आहेत. राजापूरकरांच्या या पाणीटंचाईच्या ससेहोलपटीला जबाबदार कोण प्रशासन की लोकप्रतिनिधी असा सवाल काझी यांनी उपस्थित केला आहे.

आता निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत तसा हा धरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतीच उद्योजक व पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या धरणाच्या कामाची पहाणी केली व यासाठी उर्वरित निधी देण्याची ग्वाही दिली. त्याचे आपण स्वागतच करतो. मात्र सामंत यांनी या धरणाच्या कामापेक्षा जर खरोखरच राजापूरवासीयांना २४ तास पाणी द्यावयाचे असेल तर शिळ जॅकवेलकडून राजापूर शहरात साठवण टाकीत येणाऱ्या पाण्यासाठी स्वतंत्र पाईपालईन मंजूर करावी व त्यासाठी निधी द्यावा राजापूरवासीय नक्कीच आपल्याला धन्यवाद देतील असे काझी यांनी नमुद केले आहे.

कोदवली धरण हे केवळ राजकिय गाजर झाले आहे. राजापूर वासीयांवरिल पाणीटंचाईचे संकट दूर करण्याची कोणालाच काही पडलेली नाही तर आपली राजकिय पोळी भाजण्यासाठी या धरणाचे गाजर राजापूरकरांना दाखविले जात आहे. मात्र आता राजापूरकर जे समजायचे ते समजले आहेत, त्यामुळे या निवडणूकीत राजापूकर हे धरणाच्या कामाचे राजकारण करून आपली राजकिय पोळी भाजणाऱ्यांना नक्कीच धडा शिकवतील असेही काझी यांनी नमुद केले आहे.