फ्रान्समध्ये सापडली छत्रपतींची अप्रकाशित बखर, नव्याने येणार इतिहास

कोल्हापूर : ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’मध्ये (National Library of France) इतिहास संशोधनासाठी (History Research) लागणारी काही जुनी कागदपत्रे चाळत असताना पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.

मोडी लिपितील (Modi Script) हस्तलिखित स्वरूपात असलेली ही सन १७४० नंतर लिहिलेली बखर आत्तापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज मानला जातो. छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे.

इतिहास संशोधक गुरुप्रसाद मूळचे कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील आहेत. त्यांचा जन्म, शिक्षण येथेच झाले आहे. नोकरीनिमित्त ते पुणे येथे राहत आहेत. मनोज हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत आहेत. त्यांना इतिहास संशोधन, लेखनाची आवड आहे. सहा महिन्यांपूर्वी फ्रान्समधील ‘बीएनएफ’ येथील हस्तलिखित पान विभागात जुनी कागदपत्रे पाहताना या दोघांना मोडी लिपीमधील काही कागदपत्रे दिसून आली.

त्यांचा अभ्यास करताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर सापडली. ही बखर चिमाजीअप्पांच्या सिद्दीवरील स्वारीनंतर म्हणजे अंदाजे १७४० नंतर लिहिली गेली असावी. बखरीच्या शेवटी ‘ही किताबत राजश्री राघो मुकुंद याची असे.’ असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व एक्क्याण्णव कलमी बखरींचा पूर्वसुरी दस्तावेज आहे असे म्हणता येईल.’बीएनएफ’ संग्रहालयाच्या सूचीनुसार युरोप खंडातील संस्कृत भाषेचे पहिले पंडित उजेन बर्नूफ याच्या संग्रहात संस्कृत आणि अन्य संकीर्ण विषयांशी संबंधित हस्तलिखिताचे ६८६, ६८७, ६८८ हे तीन खंड आहेत. टॉम हॅमिल्टन हे उजेन बर्नूफ याचे वडील जीन-लुई बर्नूफ यांचे गुरू होते. जीन-लुई यांना हा हस्तलिखित संग्रह टॉम हॅमिल्टन यांनी दिले असावे आणि या मार्गाने हा संग्रह उजेन बर्नूफ याच्या संग्रहात पोहोचला असावा. १८५४ साली बर्नूफ यांचा संग्रह ‘बीएनएफ’ने खरेदी केला आणि त्यावेळीपासून ही हस्तलिखिते ‘बीएनएफ’ येथील बर्नूफ यांच्या संग्रहात आहेत. या हस्तलिखित संग्रहामध्ये ही अप्रकाशित बखर होती.