हुल्लडबाज पर्यटकांवर खाकीचा बडगा
तब्बल ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
आंबोली : आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या ४५ हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्यात आली. रविवारी सावंतवाडी वाहतूक पोलिसांनी हा कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये ट्रिपल सिट, सुसाट दुचाकीस्वार, चारचाकी गाड्यांना काळ्या काचा, ड्रंक अँड ड्राईव्ह आदीवर कारवाई करण्यात आली. यात ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.तर एकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवीण गुरु सिद्दाप्पा बटगुरकी असे त्याचे नाव आहे. त्याला मोटर वाहन कायद्यानुसार सावंतवाडी न्यायालयाने १० हजाराचा दंड ठोठावला.
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पावसाच्या आगमनाबरोबरच अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. याबरोबरच मुख्य धबधबा, चौकुळ बाबा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे या परिसरात पावसाळी पर्यटकांचा लोंढा चांगलाच वाढला आहे. हे धबधबे पाहण्यासाठी जाणाऱ्या ४५ जणांवर मोटर वाहन कायद्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई वाहतूक पोलीस मयूर सावंत, गुरु नाईक, सुनील नाईक, राम साटेलकर यांनी केली.












