दुर्मिळ रक्तगटाचे एसडीपी प्लेटलेट्स् दान करीत दिले जीवनदान
सावंतवाडी । प्रतिनिधी : दैव बलवत्तर असले व देवावर श्रद्धा असली की कोणीतरी देवदूत बनून मदतीला धावून येतो याचा प्रत्यय एका महिलेला आला. गोवा बांबुळी रुग्णालयात पतीची बायपास शस्त्रक्रिया असताना दुर्मिळ अशा ‘बी निगेटीव्ह ‘ रक्तगटाचे रक्त व एस डी पी प्लेटलेट्स उपलब्ध होत नसताना उभादांडा वेंगुर्ला येथील एक युवक रक्तदाता देवदूत म्हणून धावून आला व त्याच्या रक्तदानामुळे ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली व त्यांचे प्राण वाचले.
गुरुवार दिनांक १ ऑगस्ट रोजी साखळी गोवा येथील शाम नाईक साखळी या रुग्णाला ह्रदय शस्त्रक्रियेच्या वेळी दूर्मिळ अशा बी निगेटीव्ह फ्रेश ब्लडच्या चार बॅग्जची तसेच फ्रेश सिंगल डोनर प्लेटलेट्सची तातडीची गरज होती. दूर्मिळ रक्तगट असल्याने एकाचवेळी रक्तदाते मिळत नसल्याने रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया ठरल्यावेळी होणे शक्य होत नव्हते. त्यांची पत्नी हवालदील होऊन अनेक जणांना फोन करुन रक्तदाते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होती. मोठ्या मुश्किलीने तिने दोन-तीन रक्तदाते गोळा केले होते.
परंतु दुर्दैव तिचे असे की, कोणातरी तिला फोन करुन सांगितले की, येणारे रक्तदाते येऊनही काही उपयोग नाही, तुझ्या पतीची बायपास शस्त्रक्रिया आता होणार नाही. ती तर फारच हतबल झाली व तीने देवाचा धावा सुरू केला. अखेर तिच्या सुदैवाने त्याच दिवशी ज्या दुसऱ्या रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया झाली, त्या पेशंटची मुलगी शिल्पा गवस ही तिच्यासाठी देवासारखी धावून आली. तिने ताबडतोब रक्तमित्र बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून परबवाडा, वेंगुर्ला येथील रक्तमित्र बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ यांच्या कानावर ही गोष्ट घातली.
त्यांनी रुग्णाच्या पत्नीला फोन केला आणि तिला धीर दिला व थेट बांबोळी रुग्णालयातील रक्तपेढीमधील श्रेया सरवणकर यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यांनी रुग्णाला हाॅस्पिटलमधून कोणीही तुमची शस्त्रक्रीया पुढे ढकलणार, असे सांगितलेले नाही. आणि पुरेसे रक्तदाते मिळालेले आहेत, फक्त एक युनिट एसडीपी प्लेटलेट्सची आवश्यकता आहे अशी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी रक्तदाते जय मांजरेकर यांच्याशी सिंगल डोनर प्लेटलेट दान करीता संपर्क साधला असता ते ताबडतोब गोवा मेडीकलमध्ये गेले.
जय मांजरेकर यांनी आपल्या आयुष्यातील प्रथमच संस्मरणीय असे एस डी पी प्लेटलेट्स दान केले. एस डी पी प्लेटलेट्स दान करण्याची प्रक्रिया सुमारे सव्वा ते दीडदोन तास चालते. मात्र, जय मांजरेकर यांनी क्षणाचाही विचार न करता जीएमसीला पोहोचले आणि त्यांनी हे अतुलनीय कार्य करुन रुग्णाचा जीव वाचवला.
या एकूणच प्रक्रियेत प्रथम बाबली गवंडे त्यानंतर बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ व जय मांजरेकर यांनी समयसूचकता दाखवून रुग्णाचे अमूल्य प्राण वाचविण्यासाठी धावपळ करीत एका रुग्णाला नव जीवन दिले. आपल्या पतीला वेळेवर रक्तपुरवठा झाल्यामुळे पेशंटच्या पत्नीने साश्रू नयनांनी रक्तदात्याचे व या प्रक्रियेत सहभागी सर्वांचेच आभार मानले.











