सडामिऱ्या येथील ग्रामस्थांचाही पोर्ट औद्योगिक क्षेत्राला विरोध

ग्रामसभेत एकमुखाने विरोधाचा ठराव मंजूर

रत्नागिरी : प्रतिनिधी
जाकिमिऱ्या पाठोपाठ सडामिऱ्या येथील ग्रामस्थांनी पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी खासगी क्षेत्राच्या भूसंपादनाला विरोध केला असून ग्रामस्थांना अंधारात ठेवून घेण्यात आलेला हा निर्णय आणि बजावण्यात आलेल्या नोटिसींना त्यांनी विरोध केला आहे. दरम्यान येत्या २ सप्टेंबर रोजी या प्रश्नावर संपूर्ण मिऱ्या ग्रामस्थ एकत्र येणार आहेत.

रत्नगिरी शहराजवळील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या भागातील १७६.१४९ हेक्टर खाजगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अन्वये भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना २९ जुलैला जारी झाली आहे. विविध वस्तूंच्या स्टोरेज, व्यवस्थापन, वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे.  यासाठी मिऱ्या येथील सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहिर केले आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. या लॉजिस्टिक पार्कसाठी मिऱ्या येथील खाजगी क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे प्रकरण ६ च्या तरतूदी लागू केल्या आहेत. सदरचे क्षेत्र कलम २ खंड (ग) नुसार अधिसूचित करण्याचा प्रस्तावास धिनियमाच्या कलम ३२(१) पुर्वी खालील अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजूरी दिली आहे. २६ जुलै २०२४ च्या शासन राजपत्रात प्रसिध्द केली आहे.

मात्र अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध होईपर्यंत येथील ग्रामस्थांना याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. ग्रामस्थांना अंधारात ठेवून हि अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यामुळे सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. रत्नागिरी शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या मिरजोळे आणि झाडगाव या दोन औद्योगिक वसाहती मधील सुमारे 50% भूखंड अद्यापही रिकामे आहेत. तेथे उद्योग सुरु करता येणे शक्य आहे. असे असताना पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्योग विभाग खासगी जागा का बळकावत आहे असा सवाल मिऱ्यावासीयांनी विचारला आहे. कुणालाही विश्वासात न घेता लादलेल्या या पोर्ट औद्योगिक क्षेत्राला सडामिऱ्या-जाकीमिऱ्या यथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

काही दिवसापूर्वी मिऱ्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेत या औद्योगिक क्षेत्राला एकमताने विरोध करण्यात आला. तसा ग्रामसभेचा ठराव केला. त्यानंतर आज सडामिर्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच साहिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आली होती. त्यामध्येही पोर्ट औद्योगिक क्षेत्रासाठी सडामिऱ्या-जाकीमिऱ्या येथील खासगी क्षेत्राच्या भूसंपादनाला ग्रामस्थांनी कडाडुन विरोध केला आहे. जवळच एमआयडीसी आहे तिथे उद्योग आणा आम्ही तिथे कामाला येऊ पण या औद्योगिक क्षेत्र विकासाच्या नावाखाली देशोधाडीला लागणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

दरम्यान संपूर्ण मिऱ्या वासियांची एकत्रित बैठक येत्या २ सप्टेंबर रोजी होणार असून त्यामध्ये हि भूमिका अधिक स्पष्ट होणार आहे.