भ्रष्टाचाराचा अनुभव असेल्या विरोधकांचे आंदोलन राजकारणासाठी

 

 

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले 

कणकवली : आज राज्यातील विरोधक हे पुतळा पडल्या प्रकरणावरून भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत. मात्र काही काळ तेही सत्ताधारी होते, त्यांना अशा भ्रष्टाचाराचा अनुभव आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचार होऊ शकतो का ? शिवराय हे दैवत असून महामानवाच्या पुतळ्यात कोणी भ्रष्टाचार करेल असे म्हणता येणार नाही, असे सांगताना विरोधकांकडून याविषयीचे राजकारण केले जात आहे. असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला.

 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. रामदास आठवले यांनी राजकोट येथील पुतळा संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. रमाकांत जाधव राज्य सह सचिव, अजित कदम जिल्हाध्यक्ष, सुशांत सकपाळ कोंकण प्रदेश युवक अध्यक्ष, सतीश कोरगांवकर गोवा अध्यक्ष , बाळा बनसोडे गोवा राज्य प्रभारी, शंकर उसपकर कोंकण प्रदेश सह सचिव, प्रकाश कांबळे जिल्हा सरचिटणीस, आनंद पेंडुरकर जिल्हा कोशाध्यक्ष, सखाराम कदम कार्याध्यक्ष, प्रशितोष कदम रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष, ज्योती जाधव महिला बालकल्याण सभापती दोडामार्ग, सर्व तालुकाध्यक्ष सिंधुदुर्ग, पदाधिकार व कार्यकर्ते तसेच रत्नागिरी मधील सर्व युवक पदाधिकारी व गोवा राज्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

जोडे मारो सारखे आंदोलन चुकीचे असून चौकशी समितीचा अहवाल आल्यावर जबाबदार ठरलेल्यांवर कारवाई होईल.

 

मंत्री आठवले म्हणाले, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा देशतील पहिलाच प्रकार असावा. अमेरिकेत तीन समुद्रांमध्ये असलेल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी हा पुतळा शेकडो वर्षे उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत असलेले छत्रपती होते. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शिवाजी महाराज मुघलांविरोधात लढले नसते तर सारा देश मुघलमय झाला असता. त्या शिवरायांचा पुतळा आशा प्रकारे पडावा ही अपमानास्पद घटना आहे. मुखमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून समिती देखील नेमली आहे. मात्र नवोदित कलाकारांना एवढा मोठा पुतळा बनविण्याचे काम दिलेच कसे ? असा सवाल करताना ते म्हणाले, महाराष्ट्रात राम सुतार, सारंग, यांच्यासारखे मोठे कलाकार असताना नवख्या कलाकारांना ऑर्डर का देण्यात आली ? याचा विचार करावा. पुतळा पडणे ही बाब गंभीर आहे त्यामुळे पुतळा पडण्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

 

ना. आठवले म्हणाले, सत्ताधारी, विरोधक व तज्ञ लोकांची एक समिती नेमावी आणि त्या माध्यमातून पुतळे उभारताना घेण्यात येणारी दक्षतेवाबत या समितीचे मार्गदर्शन घेण्यात यावी अशी मागणी राज्याच्या मुखमंत्र्यांकडे आपण करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.