Sawantwadi | आरोसबाग तिठ्यावर दीड लाखांची दारू जप्त

इन्सुली एक्साईजची कारवाई

 

बांदा (प्रतिनिधी) :

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने पंढरपूर येथील एकाला ताब्यात घेतले. सदर कारवाई सोमवारी रात्री उशिरा जुन्या बांदा-पत्रादेवी रस्त्यावर आरोसबाग तिठ्याजवळ करण्यात आली. विशाल बिभीषण गायकवाड (२७, रा. वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या कडून दीड लाखाच्या बेकायदा दारूसह ४ लाखाची कार असा मिळून साडे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या तपासणी नाका पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुन्या पत्रादेवी-बांदा आरोसबाग तिठा येथे सापळा रचण्यात आला होता. वाहनांची तपासणी करत असताना गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कारला (एमएच १३ एझेड ८१२९) तपासणीसाठी थांबविण्यात आले. यावेळी कारमध्ये गोवा बनावटीची बेकायदा दारू आढळून आली. पथकाने कारच्या मागील सीटवर व डिकीत भरलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या ७५० मिली मापाच्या ३०० सिलबंद बाटल्या (२५ खोके) जप्त केल्या. याची किंमत दीड लाख रुपये आहे. तसेच चार लाख रुपये किमतीची कार असा एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

 

याप्रकरणी कार चालक विशाल गायकवाड त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीप रासकर, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करीत आहेत.

—–