
योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे ” ग्रँड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथकाचे लोकार्पण
सावंतवाडी । प्रतिनिधी : पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततामय पर्यटन ही संकल्पना पुढे येणे आवश्यक आहे. या जिल्ह्यात पर्यटनासाठी आल्यावर आपला काळ कसा शांततामय वातावरणात व्यक्तित होतो याची जाणीव झाल्यास जगभरातील सर्व पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओढ निश्चितच लागेल. यासाठी काही संकल्पना राबवायच्या आहेत. तसेच सिंधू मित्र फाउंडेशनने ज्या पद्धतीने फिरता दवाखाना ही संकल्पना राबविली आहे त्यापुढे जाऊन जिल्ह्यातीत निसर्गाच्या सान्निध्यात ‘आरोग्य पर्यटन’ ही संकल्पना राबविल्यास त्याचा या जिल्ह्यातील पर्यटनाला उपयोग होईलच तसेच रोजगाराच्या अनेक नव्या संधी त्यातून निर्माण होतील, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी जिल्ह्यात चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देत संघाचा स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट काम केले असल्याचे सांगत डॉ. ठाकरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या ” ग्रँड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी सावंतवाडी राजवाडा येथील बँक्वेट सभागृहात संपन्न झाला. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रमुख पाहूणे सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ.शोभा धामापूरकर, सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, भाजपचे शरद चव्हाण आदी उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, संघाचे स्वयंसेवक असलेल्या डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने पुण्य कर्म केले आहे.बरेच ठाकरे पाहिले पण आमचे ठाकरे समाजसेवक आहेत. वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी सतत साकारत्मक दृष्टीकोन ठेवून पाठपुरावा केला. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले पण ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मला वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर करण्याची संधी मिळाली.
ते म्हणाले,शासकीय मेडिकल कॉलेज रूग्णालय व्हावे म्हणून डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी पडद्याआड राहून फार मोठे कार्य केले. त्यांनी गावागावात जाऊन ठराव गोळा केले. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मूर्त रूप आले.
चांगलं काम केलं की त्याचं चांगलं फळ देखील इथेच मिळतं. त्यामुळे संवेदना जिवंत ठेवणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संवेदना जिवंत ठेवली पाहिजे. शांततामय सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन थिम ठेवून वाटचाल केली पाहिजे. जगभरातून जिल्ह्यात येणारा पर्यटक शांततामय पर्यटन करु शकतो. त्याचा या जिल्ह्यातील काळ शांततामय व्यतीत होऊ शकतो या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.तसेच त्याचे पुढचे पाऊल म्हणून जिल्ह्यात आरोग्य पर्यटन देखील पुढील काळात करू शकलो तर रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, या देशाला सेवा कार्याची गरज आहे. हे सेवा कार्यच देशाला एक वेगळी दिशा देऊ शकते. देशातील १३० कोटी जनतेने विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले तर देश पुढे जायला वेळ लागणार नाही.
त्यासाठी समर्पणाची भावना महत्त्वाची आहे व ही भावना घेऊनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करीत आहे.देशाचे पंतप्रधान असले तरी जनसेवक म्हणून ते काम करीत आहेत कारण त्यांच्यात आजही एक स्वयंसेवक दडला आहे. याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले डॉ. प्रवीण कुमार ठाकरे व त्यांचे सर्व सहकारी करीत असलेले कार्य निश्चितच स्तुत्य असून त्यांच्या या कार्यात सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्राशी समर्पित भावनेतून व देशाप्रती निष्ठा ठेवून भारतीय संस्कृतीचे संगोपन करत आहे. याचाच आदर्श ठेवून सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठान जनतेला सेवा देत आहे. आरोग्य सेवा मिळत राहीली पाहिजे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जमिन प्रश्न शेवटच्या टप्प्यात आहे. ते झाल्यावर चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल. श्रीमंत बापूसाहेब महाराज, श्रीमंत शिवराम राजे भोसले यांचा या शहराला वारसा आहे.
हा वारसा जतन करताना त्या दृष्टीने काम केले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
युवराज लखमराजे भोसले म्हणाले, डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे यांनी सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागासाठी आरोग्य सेवा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नक्कीच तो फायदा जनतेला होईल. सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ही संस्था परिवाराप्रमाणे काम करीत आहे. आरोग्य व समाज क्षेत्रात ही संस्था यापुढेही अधिकाधिक चांगले काम करील याचा विश्वास आहे व त्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील असे यावेळी लखमराजे भोसले यांनी सांगितले. लवू महाडेश्वर यांनी विचार मांडले.
यावेळी फिरत्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख दीपक गावकर, अँड्यु फर्नांडिस, उदय नाईक, प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, रेलिंग फाउंडेशनचे विवेक दोषी आदी उपस्थित होते.
सिंधु मित्र सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांनी प्रास्ताविक तर डॉ राहुल गवाणकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर गुरूनाथ राऊळ यांनी आभारप्रदर्शन केले.












