Goa Mopa International Airport
मडगाव : दाबोळीतील विमाने मोपाला हलविल्यानंतर दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचा विपरित परिणाम होणार, अशी भीती यापूर्वीच व्यक्त केली जात होती आणि आता ही भीती आता खरी ठरली आहे.
यापूर्वी पावसात ऑफ सिझन दराचा फायदा उठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षिण गोव्यात देशी पर्यटक येत होते. मात्र, यंदा या पर्यटकांमध्ये किमान ५० टक्क्यांनी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गोव्यातील पावसाची मजा अनुभवण्यासाठी आणि ऑफ सिझनमध्ये हॉटेल्सचे दर कमी असल्याने जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत देशी पर्यटक गोव्यात यायचे. यातील बहुतेक विमानाने येणारे पर्यटक दाबोळीला उतरायचे आणि रेंट अ बाईक किंवा रेंट अ कार घेऊन दक्षिण गोव्यातील विविध ठिकाणी भ्रमंती करायचे. मात्र, यंदा हे पर्यटक निम्म्याने कमी झाले, अशी माहिती हॉटेल व्यावसायिक तथा केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी दिली.
वाझ म्हणाले की, हे पर्यटक दोन ते तीन हजार यादरम्यान भाडे देणाऱ्या पर्यटकांपैकी असून दक्षिण गोव्यातील विविध गेस्ट हाऊस आणि लहान हॉटेल्समध्ये राहायचे. त्यामुळे ऑफ सिझनमध्येही दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यवसाय बरा चालायचा.
मात्र, दाबोळीला विमाने उतरण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर हे प्रमाणही बरेच घटले आहे. याचा फटका फक्त लहान आणि मध्यम हॉटेल्सनाच बसलेला आहे असे नव्हे तर तारांकित हाॅटेल्सनाही बसला आहे. रेडिसन या पंचतारांकित हॉटेलचा ऑफ सिझन दर ८ ते १० हजार एवढा असायचा, मात्र यावेळी त्यांनी ४ ते ५ हजार रुपयांनाही आपले रुम्स दिले.
वॉटर स्पोर्टस व्यवसाय आतबट्ट्यात
बाणावली व काेलवा या भागात वॉटर स्पोर्टस्मध्ये कार्यरत असलेले पेले फर्नांडिस यांनीही या पावसाळी हंगामात देशी पर्यटकांनी दक्षिण गोव्याकडे पाठ केली, ही गोष्ट मान्य केली. पूर्वीच्या तुलनेत यावेळी ४० टक्केही देशी पर्यटक दक्षिण गोव्यात दिसले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
रेंट अ कार व्यावसायिक सेबी डिमेलो यांनीही जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत दक्षिण गोव्यात आलेले पर्यटक मागच्या काही हंगामांच्या तुलनेत बरेच कमी आहेत. त्यामुळे वास्काे भागातील टॅक्सीचालकांना त्याचा फटका बसला, अशी माहिती दिली.
तीन तासांचा प्रवास मुळावर
लहान आणि मध्यम हॉटेल व्यावसायिक संघटनेचे माजी अध्यक्ष सेराफिन कोता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोपाहून दक्षिण गोव्यात येण्यासाठी किमान अडीच ते तीन तास प्रवास करावा लागतो. त्यामुळे विमानाने येणाऱ्या देशी पर्यटकांनी दक्षिण गोव्याकडे पाठ केली आहे. फक्त स्वत:च्या गाड्या घेऊन जे पर्यटक येतात, तेच दक्षिण गोव्यात फिरतात, असे त्यांनी सांगितले.












