छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. 6 महिन्यांच्या बाळासह महिला डॉक्टरनं गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.
दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या महिला डॉक्टरचा मृतदेह हाती लागला आहे. मात्र बाळाचा अद्याप शोध लागलेला नाहीये. या महिलेनं आत्महत्या का केली याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डॉक्टरने 6 महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. पूजा प्रभाकर व्हरकटे असे मृत महिलेचे नाव आहे. चांगतपुरी येथे जायचे आहे म्हणून पैठण शहरातून पूजा प्रभाकर व्हरकटे या ऑटो रिक्षामध्ये आपल्या 6 महिन्यांच्या बाळासह निघाल्या होत्या.पाटेगाव पूल आल्यानंतर गोदावरी नदीचे पाणी पाहायचे आहे, असे म्हणत त्यांनी रिक्षा थांबवली अन् रिक्षातून उतरून बाळासह नदीत उडी घेतली. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर महिलेचा मृतदेह सापडला असून, बाळाचा मात्र शोध लागलेला नाही. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.












