देवीच्या जयघोषात भव्य मिरवणुकीने देवीचे आगमन
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या पाषाण मूर्तींचे सोमवारी दुपारी 3 वाजता देवघर पेट्रोल पंप येथे आगमन झाले. यानंतर येथून वाजत गाजत भव्य रॅलीने ग्रामदेवतेचा जयघोष करत ही रॅली निघाली.तळवली गावच्या सीमेवरून ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या पाषाण मूर्तींची मिरवणूक वाजत गाजत आणण्यात आली.

पंढरपूर येथून तयार करून आणलेल्या पाषाण मूर्ती देवघर पेट्रोल पंप येथुन दुपारी 3.30 वाजता गावातील दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहने देवघर पेट्रोल पंप येथून भव्य रॅलीने ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा जयघोष करत ही रॅली तळवली हायस्कूल येथे सीमेपर्यंत आणण्यात आली.यानंतर तळवली गावच्या सीमेवरून ढोल-ताशांच्या आणि सनईच्या सुरात ही मिरवणूक गावच्या सहाणेपर्यंत आणण्यात आली.
तळवली गावची ग्रामदेवता सुकाई देवी ही जागृत असून भक्तांच्या हाकेला धावून धावणारी अशी तिची ख्याती आहे.अनेक वर्षांच्या कालखंडानंतर हा पाषाण मूर्ती जीर्णोद्धार सोहळा पार पडत असल्याने मोठ्या उत्साहाचे वातावरण गावात निर्माण झाले आहे.आपल्या ग्रामदेवतेच्या आगमनासाठी येथील भक्तगण मोठ्या उत्साहाने या आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते.












