अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा खोटारडेपणा उघड : संजू परब

केसरकरांनी मंजूर केलेली कामे आपण करणार असल्याच्या ‘पोस्ट’

खोटारडेपणाची रोज करणार ‘पोलखोल’

केसरकर ७० हजार मते घेऊन होणार विजयी

सावंतवाडी । प्रतिनिधी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केलेली व ज्या कामांची टेंडर निघालीत अशी कामे आपण करणार असल्याच्या पोस्ट अपक्ष उमेदवार विशाल परब व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल केल्या जात आहेत. आमदारकीची स्वप्न पाहत असलेल्या या महाठगाचा खोटेपणा उघड झाला असून त्याच्या भुलथापांना जनता बळी पडणार नाही व महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर ७० हजारहून अधिक मत घेऊन निवडून येतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी व्यक्त केला.

दरम्यान , अपक्ष उमेदवार विशाल परब व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली या दोघांचेही कारणामे आपण येत्या १३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत रोज पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत युवा सेनेचे पदाधिकारी सुरज परब उपस्थित होते.
संजू परब म्हणाले, गावातील ग्रामपंचायतीला उभा न राहीलेला हा माणूस जनतेला मोठमोठे शब्द देत आहे. सावंतवाडी शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मोती तलावातील लेझर फाउंटन व बांदा येथील राज्याचे प्रवेशद्वार ही जी विकास कामे मंत्री दीपक केसरकर यांनी ही आधीच मार्गी लावली आहेत ती आपण करणार अशा घोषणा केल्या जात आहेत. महायुती सरकारच्या काळात या कामांची टेंडर देखील निघालेली आहेत. त्यामुळे विशाल परब हा किती खोटारडा माणूस आहे हे उघड झाले आहे.

युवा प्रदेशकडून विशाल परब यांना मिळालेल्या पदाला स्थानिक पातळीवरून कोणीही शिफारस केली नव्हती. तसेच त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीला‌ भाजपमध्ये असताना मी आणि महेश सारंग यांनी विरोध केला होता. आता त्यांच्यावर भाजपकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यांना पक्षातून देखील काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्यासोबत जे सहकारी आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई करावी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. पण त्यांच्याकडून जनतेची फसवणूक होत असल्यास शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा पोलखोल करणार, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत जनतेत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. काही सह्यांमुळे हा प्रकल्प आजवर रखडला होता मात्र आता तांत्रिक सर्व बाबी पूर्ण झाल्या असून आचारसंहितेनंतर हे काम मार्गी लागेल. हे हॉस्पिटल सावंतवाडीत होणे आवश्यक आहे‌. त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असल्याने सर्वांनाच त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे. ७० हजारच्या वर दीपक केसरकर मते घेणार आहेत. तर उर्वरित ८० हजार मते तिघांत विभागली जाणार असल्याचा दावा संजू परब यांनी केला.