कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमातून कर्देसाठी 14 कोटींच्या कामांना मंजुरी

दापोली | प्रतिनिधी: कोकणातील ग्रामीण भागातील भुमीपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकास कामांची गती वाढविण्यासाठी “कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम” योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाप्रशासनाकडून कर्दे (ता. दापोली) येथील विविध कामांसाठी १४ कोटी २ लाखाचे विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्याला नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. मंजूर निधी त्या-त्या वेळी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही कामे सुरू करण्यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून घेण्यात आलेली नाहीत याची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खात्री करून घ्यावी अशा सूचनी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर तातडीने कामे सुरू करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मंजूरी, निविदा काढणे व स्वीकारणे, कार्यारंभ आदेश देणे आदी कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून घ्याव्यात असे आदेशही देण्यात आले आहेत.

कर्देसाठी मंजूर निधीमधून १ कोटी ५० लाख ३३ हजार रूपये कर्दे खाडीवर पूल बांधण्यासाठी, खाडी किनारी संरक्षक बंधाऱ्यासाठी ३ कोटी ७९ लाख २७ हजार रूपये, कर्दे येथील दुकाने व फेरिवाले झोन बांधण्यासाठी ३६ लाख रूपये, साहसी क्रीडा उद्यानांचे बांधकाम करण्यासाठी ४५ लाख, जलक्रीडा उपकरणे ठेवण्यासाठी केंद्र उभारणे ३० लाख, आरसीसी वॉच टॉवरसाठी ३० लाख, तरंगत्या जेट्टीसाठी २५ लाख, समुद्र किनारी सांस्कृतिक संकुलासाठी २ कोटी ८९ लाख, दिशादर्शक फलकांसाठी ५ लाख, खेम मंदिराच्या सुशोभिकरणासाठी २५ लाख, मंदिराच्या बांधकामासाठी ४५ लाख ३१ हजार, गिम्हवणे रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख, जाधववाडी रस्ता बांधकामासाठी १५ लाख, स्वयंचलित फुड कंपोस्ट आणि प्लास्टिक ग्रेडींग मशीनसाठी ४७ लाख ५० हजार, मोबाईल टॉवरसाठी २५ लाख रूपये मंजूर केलेले आहेत.

——————-

ग्रामीण पर्यंटन विकास योजनेंतर्गत पर्यटन विकासासाठी कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे. २०१५ पासून ग्रामपंचायतीने विकास आराखडा तयार करून ठेवला होता. त्याचा डीपीआरही बनविलेला होता. त्याचे शासनाकडे सादरीकरणही केले होते. ग्रामस्थांना नक्की काय पाहिजे, ते या आराखड्याद्वारे मांडले होते. या कामांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे पर्यंटनातून रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

– सचिन तोडणकर, कर्दे सरपंच