आंबोली घाटाच्या दाणोली चेकपोस्टवर कारवाई
सावंतवाडी : गोवा राज्यातून अवैधरित्या दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या इचलकरंजी येथील दोघांना आंबोली घाटाच्या पायथ्याशी दाणोली ट्राफिक चेक पॉईंटजवळ पकडण्यात आले. त्यांच्याकडून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या सुमारे २५० दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ॲम्बेसेडर कार (क्र. एम एच १२ – जेए – ४४९०) जप्त करण्यात आली आहे. प्रवीण ईश्वर जाणवेकर ( वय ५०, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) व
संतोष दिनकर माने ( वय ४४, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) अशी त्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारू इचलकरंजीच्या दिशेने अवैधरित्या नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, आंबोली चेक पोस्ट येथे पोलीस पथकाने नाकाबंदी लावली होती. सदर ॲम्बेसेडर कार आंबोली चेक पोस्टवर तपासणीसाठी थांबवण्याचा इशारा करताच, वाहनचालकाने पोलिसांना चकमा देण्यासाठी वाहन रिव्हर्स घेऊन वेगाने घाट उतरण्यास सुरुवात केली.
या प्रकारानंतर, पोलीस पथकाने तातडीने कारचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करताना दानोळी ट्राफिक चेक पॉईंटवर तैनात असलेल्या अंमलदारांची मदत घेण्यात आली. या संयुक्त कारवाईत आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेल्या नानापाणी या ठिकाणी कारला अडवण्यात पोलिसांना यश आले.
वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, गाडीमध्ये विविध ब्रँडच्या २ लिटर, ७५० मिली आणि १८० मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या दारूच्या अंदाजे २५० बाटल्यांचा साठा आढळून आला. पोलिसांनी लगेचच दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी:
सदरची यशस्वी कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये उपनिरीक्षक सरदार पाटील, आंबोली दूरक्षेत्रचे अंमलदार हवालदार रामदास जाधव आणि गौरव परब यांचा समावेश होता. या पथकाला दाणोली ट्राफिक चेक पॉईंटवरील अंमलदार जमादार आंबेरकर आणि हवालदार रुक्मानंद मुंडे यांनी मोलाची मदत केली. अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.












