कुर्ला येथे गोळीबाराची धक्कादायक घटना; इसम गंभीर जखमी

हलाव पुल परिसरात अचानक गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण
पोलिस आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू; संशयितांची चौकशी

मुंबईतील कुर्ला परिसरात अचानक झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. हलाव पुलाजवळ एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मुंबई : कुर्ला पश्चिम येथील हलाव पुल परिसरात एका इसमावर गोळीबाराची गंभीर घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाबा एलप्पा पवार असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या पवार यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती अत्यंत चिंताजनक (क्रिटिकल) असल्याची माहिती मिळत आहे.

घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने तातडीने घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुरावे गोळा करण्यात आले आहेत. कुर्ला वी.बी. नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी बाबा पवार यांची पार्श्वभूमी तपासली जात आहे आणि हा गोळीबार जुन्या वादातून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

गोळीबारामागचे नेमके कारण काय आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.