आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाथपंथी भटका समाज एकवटला

१ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक 

रत्नागिरी ः आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्व समाज एकवटत असताना नाथपंथी भटका समाजदेखील आता आंदोलनाच्या पवित्र्यात आला आहे. १ ऑक्टोबर रोजी राज्यातील प्रमुख सदस्यांची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केली आहे. या बैठकीत संघर्ष समितीची निवड केली जाणार आहे.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा सर्वच समाजाने उचलून धरला आहे. काही समाज रस्त्यावर उतरले आहेत तर अनेकांनी आंदोलने सुरू केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर नाथपंथी समाजाची एकजूट व्हावी आणि त्यातून संघर्षाची चळवळ उभी करण्यासाठी महाराष्ट्रातील नाथपंथी समाजात येणार्‍या जाती-पोटजातीतील प्रमुख सदस्यांची महत्वाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

नाथपंथी जमात ही भटक्या प्रवर्गात येत असून गोसावी, भराडी, नाथजोगी, डवरी गोसावी, दशनाम गोसावी, नाथबुवा, नाथसंतोषी अशा अनेक पोटजाती नाथ पंथात आहेत. हा समाज सर्वत्र विखुरलेला आहे. त्यामुळे आपली नेमकी संख्या किती? याचा अंदाज कुणालाच येत नाही. शासनदरबारी अडिच टक्क्याचे आरक्षण या समाजाला असले तरी हा समाज सर्वच बाबतीत आजही मागासलेला आहे. समाजाच्या जटील समस्या डोळ्यासमोर ठेवून नाथ संप्रदायाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यातूनच संघर्ष समितीची निर्मिती करून भविष्यात राज्यात न्याय हक्कासाठी मोठा संघर्ष उभा राहणार आहे.

दि. १ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती मंगल कार्यालय, पिसादेवी रोड, हरसूळ या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीला नाथपंथी समाजातील सर्व जमातीतील सदस्यांनी उपस्थित रहावे तसेच अधिक माहितीसाठी ९७६३७०२६६८ व ९३२१९१२१७५ येथे संपर्क साधावा असे आवाहन नाथपंथी समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.