कोकण पदवीधर निवडणुकीत श्री. डावखरे यांना मताधिक्य द्या
वैभववाडी तालुक्यात आठ ठिकाणी आ. नितेश राणे यांची आढावा बैठक संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी :
कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे हे अभ्यासू व दूरदृष्टी असणारे नेते आहेत. संपूर्ण कोकणात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. विधानसभेच्या या मतदारसंघातून डावखरे यांना शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी तालुक्यात आचिर्णे, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, कोकिसरे विद्यालय, उंबर्डे, भुईबावडा व नेर्ले या ठिकाणी प्रचारार्थ आढावा बैठक आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी पदवीधर निवडणूकीचा आढावा घेतला. आठ ठिकाणी पार पडलेल्या आढावा बैठकीला महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे संचालक प्रभानंद रावराणे, भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, प्राची तावडे, वैभव रावराणे, प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, सुधीर नकाशे, बाळा कदम, राजेंद्र राणे, संचालक संदीप पाटील, प्रकाश पाटील, रितेश सुतार, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, बंड्या मांजरेकर, उत्तम सुतार, संजय रावराणे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवीधर मतदारांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे म्हणाले, मतदारांनी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करुन सहकार्य करावे. विश्वासाने तुमचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सांगितले. कोविड काळात आ. निरंजन डावखरे यांनी ठाणे जिल्ह्यात केलेले काम हे आव्हानात्मक होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी आपला संपर्क चांगला ठेवला आहे. मतदारांशी यापुढेही ते कायम संवाद साधत राहतील.
विरोधी उमेदवाराचा देखील आपण अभ्यास करा. त्यांना कुठल्याही प्रश्नांची माहिती नाही. केवळ ते आमदारकीचे स्वप्न पाहात आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
यावेळी आ. नितेश राणे यांनी पदवीधर मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते, पदवीधर उपस्थित होते.











