Eat those who go to the project site and try to do stunts. Police beat Vinayak Raut
बारसू चेकपोष्टवर घेतले ताब्यात: चार तासांनी केली सुटका
प्रशासनाकडून होत असलेल्या सामंजस्याच्या प्रयत्नांत राऊतांचा खोडा
कोल्हापूरातुन प्रकल्प विरोधासाठी आलेल्यांनाही पोलीसांनी घेतले ताब्यात
राजापूर | प्रतिनिधी : तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून प्रकल्प विरोधकांशी सामंजस्याने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच शुक्रवारी प्रकल्पस्थळी जाऊन विरोधाची स्टंटबाजी करण्याच्या तयारीत असलेल्या उ. बा. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. बारसू परिसरात जाऊ पहाणाऱ्या खा. राऊत यांना पोलीसांनी बारसू चेकपोष्टवर ताब्यात घेतले.
त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 68 प्रमाणे कारवाई करून सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.
एकीकडे प्रशासन प्रकल्प विरोधकांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांचे शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र या प्रकल्पाला बारसू येथे मंजूरी द्यावी असे पत्र देणाऱ्या उध्दव ठाकरे गटाचे खासदार राऊत हे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुढे आले आहे.
तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाकडून प्रकल्प समर्थक व विरोधकांशी चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. गुरूवारी सायंकाळी राजापुरात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी तज्ञांच्या उपस्थित आयोजित केलेल्या बैठकीत अत्यंत चांगली चर्चा झाली. प्रकल्प विरोधकांनी यात काही मुद्दे मांडले व प्रश्न उपस्थित केले. त्याला तज्ञांकडून योग्य प्रकारे उत्तरेही देण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी स्थानिक शेतकरी, प्रकल्प ग्रस्त व प्रकल्प विरोधक यांच्या शंकाचे निरसन करूनच प्रकल्प पुढे नेला जाईल अशी ग्वाहीही या बैठकीत दिली.
मात्र अशा प्रकारे स्थानिकांशी चर्चा करून सकारात्मक परिस्थिती निर्माण होत असताना शुक्रवारी काही प्रकल्प विरोधकांनी बारसू परिसरात प्रकल्प विरोधी मोर्चाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पोलीसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता. नेहमीप्रमाणे काही प्रकल्प विरोधक बारसू सडयावर जमले होते. माती परिक्षण क्षेत्राच्या बाहेर सुमारे एक ते दीड किलोमिटर परिसरात हे आंदोलनकर्ते जमा झाले होते. व ते प्रकल्प विरोधी घोषणा देत होते.
मात्र दोनच दिवसापुर्वी प्रकल्प विरोधी आंदोलकांना भेटून गेलेल्या उ. बा. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी राजापुरात येत पुन्हा वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. सकाळी शासकिय विश्रामगृहावर अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवा यांनी त्यांची भेट घेऊन आपण आंदोलन स्थळी येऊ नये, वातावरण आता शांत होत आहे, प्रकल्प विरोधकही चांगली चर्चा करून प्रकल्पाची बाजू समजून घेत आहेत, त्यामुळे आपण आंदोलनस्थळी जाऊ नये अशी विनंती त्यांना केली.
मात्र पुन्हा एकदा खा. राऊत यांनी प्रकल्पस्थळी जात स्टंडबाजी करण्याचा केलेला प्रयत्न अखेर पोलीसांनी हाणून पाडला. रानतळे चेकपोष्ट वरून पुढे सोडण्यात आलेल्या खा. राऊत यांना बारसू चेकपोष्टवर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या सोबत असलेले विकास चाळके, चंद्रप्रकाश नकाशे, कमलाकर कदम, विद्याधर पेडणेकर, रामचंद्र सरवणकर यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 68 प्रमाणे कारवाई करण्यात आली व सायंकाळी 4.30 वाजता त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने पत्रकारांना दिली. यावेळी काही मोजकेच उ. बा. ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापुरातुन या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष जालींधर पाटील यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना रत्नागिरीत नेण्यात आले आहे.
खा. विनायक राऊतांकडून आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न
यापुर्वी बुधवारी प्रकल्पस्थळी भेट देऊन प्रकल्प विरोधकांशी संवाद साधलेला असतानाही पुन्हा शुक्रवारी उ. बा. ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत राजापुरात आले. त्यांनी बुधवारी देखील व शुक्रवारी देखील राजापुरात शासकिय विश्रामगृहात काही पदाधिकारी व प्रकल्प विरोधकांच्या बैठका घेतल्या. बुधवारी जे पदाधिकारी आले नाहीत त्यांना दमही भरला व शुक्रवारी बोलावले. तर राजापुर तालुक्यातुन कमी पदाधिकारी येत असल्याने त्यांनी लांजातील काही पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी राजापुरात येण्याचा निरोप या दोन्ही दिवशी त्यांनी विश्रामगृहावर बैठक घेतली अशी माहीती उ.बा. ठाकरे गटातुनच पत्रकारांना देण्यात आली आहे. त्यामुळे खा. राऊत हे आंदोलकांना भडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. तर याच गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे या प्रकल्पाला उघड समर्थन आणि खा. राऊत यांचा विरोध आहे. त्यामुळे खा. राऊत हे या प्रकल्पाच्या माध्यमातुन राजकारण करत असल्याचा आरोपही उ. बा. ठाकरे गटातुन होत आहे.
नियमांचे उलंघन करणाऱ्या अशोक वालम व मुलाला अटक
जामीनावर मुक्त्तता, जिल्हा बंदीचे आदेश
तालुक्यात बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्प परिसरात लागू करण्यात आलेल्या 144 कलमाचा भंग केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम व त्यांचा मुलगा विनेश वालम यांना गुरूवारी रात्री अटक केली आहे. वालम यांना पोलीसांनी 144 ची नोटीस बजावली होती व त्यांना तालुका बंदी घालण्यात आली होती. यांनी या परिसरात जात जमाव एकत्र करत भडकाऊ वक्तव्य केले होते. तर तालुका बंदी असतानाही त्यांनी ती मोडून तालुक्यात प्रवेश केला होता. त्यामुळे 144 कलमाचा भंग केल्याप्रकरणी त्यांना मुलासह अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आयपीसी 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली असून न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली आहे. मात्र आता त्यांना जिल्हाबंदीचे आदेश बजावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली.










