
प्रत्येक घरासमोर होतोय शंखनाद…
गोसावी बांधवांची पतीर फेरी सुरु
कोकणात गोसावी समाजाचा अनोखा नवरात्रोत्सव ; अष्टमीला होतो ‘भंडारा’
– किशोर राणे
अरबूज नरबूज दुमदुम का
काडी अक्षर होय उच्चार
कोण गुरुने घट स्थापिला?
कोण घट…??
घट थांबेगा… मठ थांबेगा …
आसन बैठे पाषाण बैठे …
ओम नमो गुरु का आदेश…
ओम नमो गुरु का आदेश …
नामदेव गोसावी गुरुमंत्र म्हणत होते.ते समाजातील अनेक परंपरा जाणतात. मार्गदर्शन करतात. सध्या गोसावी समाज बांधवांची पतीर फेरी (काही भागात याला जोगीन असेही म्हणतात) गावगावात सुरु झाली आहे. नवरात्रोत्सवात सर्व देव -देवता स्थिर झाल्या असताना गुरुंच्या आदेशा प्रमाणे हे पतीर प्रत्येक घरासमोर पोहोचत आहेत. तेथे शंखनाद करताच पतीराची गृहस्थी मनोभावे पुजा करतात. मनातील इच्छा तेथे व्यक्त केली जाते अन …ती इच्छा पुर्णही होते म्हणे.पुन्हा वर्षभराने पतीर घेऊन गोसावी बांधव पोहोचतात तेव्हा काही भागात नवस पुर्तीही होत असल्याचे गोसावी बांधव सांगतात. या गोसावी पंथाचा गावागावात मठ आहे. सिध्द महापुरुष नावाने त्याची ख्याती आहे. येथे नवरात्रीचा उत्सवही परंपरे प्रमाणे होत असतो.अष्टमीला भंडारा होतो. हरकुळ खुर्द येथे असलेल्या मठात भाविकांना मटण अन आंबोळ्यांचा प्रसाद दिला जातो…प्रत्येक गावानुसार भंडाऱ्याच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस आठ रात्री सर्व देवता शक्तीची प्रतिके शांत असतात… यावेळी शिवशक्तीला आराध्य मानत गुरु परंपरा जिवापाड जपतानाच त्यांच्या आदेशानूसार गोसावी बांधव हातात शंख, काखेला झोळी आणि दुसऱ्या हातात पतीर घेऊन प्रत्येकाच्या घरासमोर दाखल होतो. याला काही गावात जोगीन असे म्हणतात. शंखनाद करताच घरा घरातील मंडळी मनोभावे पतीराची पूजा करतात. शिधा दिला जातो. इडा पिडा टळो..घर भाट धन धान्याने भरू दे ऽऽ असा आशीर्वाद देत जोगीन पुढे रवाना होते. वर्षातून फक्त एकदाच ही जोगीन घेऊन शंखनाद करत घरा समोर येणाऱ्या गोसावी समाज बांधवांचा हा अनोखा नवरात्र उत्सव, पतीर फिरवण्याची परंपरेला तेवढाच मोठा इतिहास आहे.
गोसावी समाजात शंख आणि गुरुस्थानाला मोठे महत्त्व आहे. गुरुचा आदेश शिरसावंद्य म्हणून प्रत्येक पाऊल टाकणाऱ्या या समाजातील प्रथांबाबत सांगताना हरकुळ खुर्द येथील आप्पानाथ गोसावी म्हणाले, जोगीन फिरवण्याची परंपरा ही गावागावात आहे. प्रत्येक गोसावी समाजातील घराण्यांना गावे वाटून देण्यात आली आहेत. पिढ्यान् पिढ्यांचा हा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवरात्रीत सर्व देव स्थिर असताना आदिशक्तीला सहाय्य करताना गावातील रयतेची काळजी घेण्याचा आदेश शिवशक्तीने नवनाथांना दिला. तोच गुरु वारसा सांगणारा नाथ संप्रदायातील गुरु परंपरेचा शंखनाद …आदेशऽऽ पिढ्यान पिढ्या आम्ही पुढे नेत आलो आहोत.
जग बदलले नव्या युगात कामाची पद्धती बदलल्या. नव्या पिढीने, नव्या वाटा धुंडाळल्या. कामाच्या शोधात अनेक जण स्थलांतरित झाले. मात्र घरासमोर शंखनाद झालाच पाहिजे. जोगीन पूजा व्हायला हवी असा ज्येष्ठांचा आग्रह असतो म्हणून काही गोसावी बंधू कामाच्या व्यापातही परंपरा जपण्यासाठी गावात दाखल होतात. प्रथेप्रमाणे पतीर घेऊन झोळी लटकवत शंखनाद करत देवाच्या रखवालीची सेवा रुजू करतात. हा वारसा जपण्याच्या परंपरे मागचे शास्त्र समजून घ्यायला हवे असे ते म्हणतात.
हरकुळ खुर्द येथे नवरात्रीच्या उत्सवात आप्पानाथ गोसावी, लवू गोसावी हे बंधू हा वारसा मोठ्या जबाबदारीने पेलत आहेत. आठ दिवस ही भ्रमंती सुरू असते. भल्या पहाटे पुजा अर्चा करुन पतीर घेऊन ते रवाना होतात.सायंकाळ होण्यापूर्वी पुन्हा पतीर घेऊन मठात पोहोचतात. काहीही झाले तरीही रात्र होण्यापूर्वी पतीर झोळी मठात पोहोचायला हवी असा त्यांचा आग्रह असतो. आठ दिवसात झोळीत जमा झालेले तांदूळ आणि तेल मठातल्या उत्सवासाठी वापरले जाते.
भंडाऱ्या दिवशी घटाचे उद्यापन केले जाते. अष्टमीला गावातल्या शिंगोबाच्या चाळ्याला भक्ष दिला जातो. तांदूळापासून आंबोळ्या केल्या जातात. घटाची उत्तरपूजा झाल्यावर महापुरुषाच्या मठात येणाऱ्या प्रत्येकाला चिकन आणि आंबोळीचा प्रसाद म्हणून दिला जातो. उत्तर रात्रीपर्यंत हा कार्यक्रम चालतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामदेवतेच्या मंदीरात घटाचे उद्यापन केले जाते. यानंतर गावातील मानकऱ्यांनाही पोळी अन चिकनचा प्रसाद देण्याची परंपरा कायम आहे. काही गावात भंडाऱ्याची परंपरा वेगळी आहे. काही गावात भाकऱ्या आणि उसळ करून प्रसाद वाटतात तर काही गावात सांदणे आणि भाजी दिली जाते पण भंडारा होतच असतो हे विशेष!
लोरे नंबर दोन येथील नामदेव गोसावी सांगतात, गुरुंच्या आदेशावरच हे जग चालले आहे. या आदेशाची परंपरा आमचा समाज जपत आहे. समाजातील प्रत्येकाला गुरु घ्यावाच लागतो. ते आमचे भाग्य… यावेळी त्यांनी गुरुमंत्राची महतीच सांगीतली. नवरात्रीतल्या पतीर फेरीबाबत ते म्हणाले, मिरवेलीची पाने पतीरात ठेऊन गुरुस्थानावर पूजा केल्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात आम्ही दाखल होतो. ग्रामदेवतेकडे पुजा केल्यावर वाडिवस्त्यांवर आम्ही अनवाणी फिरतो. गोसावी समाजात शंखाला जेवढे स्थान मोठे तेवढेच पतिराचाही मान मोठा… दुधी भोपळ्यापासून हे पतिर बनवले जाते. आजच्या पीढीनेही हा वारसा जपावा असे ते सांगतात.
गोसावी समाजात कांचीरे महत्वाचे…
गोसावी समाजात नवरात्रोत्सवाप्रमाणेच अन्य परंपराही वेगवेगळ्या आहेत. या समाजात कानात बाळी घालण्याचा रिवाज मोठा आहे. स्त्री -पुरुष या दोघांमध्येही बाळी घातली जाते. बाळी घालण्यापुर्वी गुरुंचा आदेश स्विकारावा लागतो. गुरुमंत्र घेतल्या शिवाय बाळी घातली जात नाही.या परंपरेला ‘कांचीरे’ असे म्हटले जाते. गुरुंची दीक्षा स्वीकारल्यानंतर कान टोचले जातात आणि कानात सोन्याची अथवा ज्याची इच्छा असेल तशी बाळी घातली जाते. ही बाळी मग शेवटपर्यंत उतरवली जात नाही.











