भरधाव कारचा टायर फुटल्याने कार पलटी

वेत्ये येथील अपघातात महिला गंभीर : दोघे जखमी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
भरधाव कारचा टायर फुटल्याने गाडी झाडाला आदळून गटारात पलटी झाली या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. तर तिचा पती व लहान मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये कैलास धाबा नजीक घडला. अपघातानंतर जखमींना वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व सहकाऱ्यांनी मदत करत खाजगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.

याबाबत अधिक माहिती की, पुणे येथील हे कुंटूब आपल्या ताब्यातील क्विड कार घेऊन मुंबई गोवा महामार्गाने पुण्यावरून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. तो वेत्ये येथील कैलास धाब्याच्या येथे आल्यावर गाडीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कारवरील ताबा सुटल्याने कार समोरील झाडाला जोरदार आदळली. यावेळी कारमधील महिला बाहेर फेकली गेली यात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तर कार झाडाला आदळल्यानंतर गटारात पलटी झाली.

यात कारमध्ये तिचा पती व मुलगा दोन्ही अडकून पडले. अपघाताची कल्पना मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे याच्यासह विश्वनाथ गावडे,सत्यवान गावडे,प्रमोद गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. कारमध्ये अडकून पडलेल्या दोघांना तात्काळ बाहेर काढले. त्यांना धीर देत १०८ रुग्णवाहीकेला फोन केला. मात्र, नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने त्यांनी खाजगी रुग्णवाहिका बोलावून तिघांना उपचाराकरिता रुग्णालयात पाठविले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून तिघेही बालंबाल बचावले. जखमी महिलेवर कोलगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.