दोडामार्ग (प्रतिनिधी):
दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध खनिज उत्खनन, डोंगर कापणी आणि चोरट्या वाहतुकीविरोधात आता तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
या गैरप्रकारांकडे महसूल विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या २३ एप्रिल रोजी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, सासोली, आडाळी, कुंब्रल यांसारख्या गावांमध्ये परराज्यातील व स्थानिक मायनिंग दलालांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनींमध्ये तसेच डोंगराळ भागात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन आणि डोंगर कापणी सुरू आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने खनिजाची वाहतूक केली जाते.
या प्रकारामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हे क्षेत्र ‘इको-सेन्सेटिव्ह’ झोनमध्ये येत असतानाही, तसेच आडाळी औद्योगिक विकास क्षेत्रातही (MIDC) काही दलाल मंडळींनी धुमाकूळ घातला आहे.
महसूल प्रशासनावर आरोप
दोडामार्ग महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
निवेदन सादर करणारे पदाधिकारी
या संदर्भात कुंब्रलचे सरपंच जनार्दन गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास सावळ, सेनेचे गणेश धुरी, मिलिंद नाईक, तसेच सूर्याजी नांगरे व नवसो कदम यांनी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.












