बँकेने लावलेले सिल व कुलूप तोडून सील केलेल्या घरात केला प्रवेश 

 

 

दाम्पत्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

कारवांचीवाडी आदर्श वसाहत येथील घटना 

रत्नागिरी | प्रतिनिधी :तारण ठेवलेल्या मालमत्तेमध्ये अनाधिकाराने प्रवेश करुन बँकेने लावलेले सिल व कुलूप तोडल्याप्रकरणी दाम्पत्यासह अन्य चार जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास कारवांचीवाडी आदर्श वसाहत येथे घडली आहे.

 

स्नेहल सुनिल साळवी आणि त्यांची पत्नी (दोन्ही रा.कारवांचीवाडी,रत्नागिरी) व अन्य चार अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात बँकेचे कर्मचारी रोहन राजीव पै (43,रा.विलेपार्ले पूर्व मुंबई) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या बँकेचे ग्राहक मे. परेश फार्मासिटिकल डिस्ट्रीब्युटस या संस्थेच्या भागीदारांनी गहाणदार/ जामिनदार सुनिल विश्वनाथ साळवी यांनी बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता 11 डिसेंबर 2024 रोजी तहसीलदार रत्नागिरी यांनी ताबा घेउन ती फिर्यादींकडे दिलेली होती.

त्या मालमत्तेच्या देखरेखीसाठी बँकेकडून दोन सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास स्नेहल सावळी त्याची पत्नी आणि इतर चार अज्ञातांनी त्या जागेत अनाधिकाराने प्रवेश केला. त्यानंतर तेथील इमारतीच्या मुख्य दरवाजाच्या कुलुपास बँकेने लावलेले सिल व कुलुप हातोडी व सळीने तोडले. तेव्हा तेथील दोन गार्डनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न्ा केला असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.