ठेकेदारावर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी
लांजा (प्रतिनिधी) तीन महिन्यांपूर्वी बांधलेले गटार कोसळून ट्रक कलंडल्याची घटना लांजा शहरात लांजा हायस्कूल समोर
गुरुवारी सकाळी घडली होती. गेल्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे गटाराच्या दर्जाचा नमुना देखील उघड झाला असून लांजा वासियांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील यामुळे ऐरणीवर आला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासीयांना दिले आहे.
पण घाईघाईने काम पूर्ण करण्याच्या नादात ठेकेदारांकडून कामाचा दर्जाचं ठेवला जात नाही. या गोष्टीचा प्रत्यय नुकताच लांजा हायस्कूल समोर दिसून आला. लांजा हायस्कूल समोर तीन महिन्यांपूर्वी गटाराचे काम करण्यात आले होते. चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाने ट्रक बाजूला (साईडला) घेतला. या ठिकाणी गटार आहे की नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ट्रक चालकाने जमीन समजून ट्रक बाजूला उभा केला. मात्र त्याखाली असलेले आरसीसी गटार तुटले व ट्रक एका बाजूला पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी यामुळे गटाराच्या कामाचा दर्जा काय आहे ही गोष्ट देखील अधोरेखित झाली आहे.
त्याचप्रमाणे या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिकांसह लांजा हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी ये जा करत असतात. अशावेळी जर गटाराच्या अशा पद्धतीच्या कामामुळे जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उपस्थित होत असून या घटनेने लांजा वासियांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.
दरम्यान, अशी तकलादू कामे केली जात असतील तर संबंधितावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे यांनी केली आहे.












