खेड (प्रतिनिधी) गोवा-कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर जलसफरीची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सूर्यकांत रामभाऊ पोफळकर (४५, रा. कुर्ला-मुंबई, मूळगाव ऐनवरे-सुतारवाडी, खेड) या तरुणाचा तब्बल २० तासानंतर गुरुवारी सायंकाळी ४ च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुर्घटनेतील ५ जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सूर्यकांत पोफळकर हे कुटुंबियांसह सासू-सासरे यांच्यासमवेत पर्यटनासाठी गोवा येथे गेले होते. कळंगुट येथे एका बोटीतून १३ जण सफर करत असताना अचानक बोट उलटली. या दुर्घटनेत सूर्यकांत पोफळकर हे बोटीवर धडकल्याने रक्तबंबाळ होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.










