रत्नागिरी :
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला असून, यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ‘वॉच’ (यलो अलर्ट) श्रेणीत ठेवण्यात आले आहे. ही स्थिती पुढील दोन दिवस म्हणजे २० आणि २१ एप्रिल रोजी सुद्धा कायम राहण्याची दाट शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करून ती सुरक्षित ठिकाणी हलवावीत, अशा सूचना कृषी हवामान सल्ला पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत. तसेच, थ्रेशिंग करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल व्यवस्थित झाकून ठेवावा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात योग्य व्यवस्था करावी. वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी झाडांखाली आश्रय घेऊ नये, तसेच वादळादरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करावीत.
उर्वरित महाराष्ट्राची स्थिती:
कोकणासह उर्वरित महाराष्ट्रातही हवामानात मोठे बदल होणार आहेत. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत पुढील तीन ते चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाट माथ्यावर वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपिटीसह (Hailstorm) ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, विदर्भातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.













