सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचा पुढाकार
ग्राहकांनी उपस्थित राहत समस्या मांडण्याचे केले आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज वितरण कंपनीने खरतर वीज ग्राहक मेळावा घ्यायला हवा. मात्र, वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सेवा देताना याबाबत विचार केला नाही. यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाने पुढाकार घेऊन जिल्ह्यात मेळावे सुरू केले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी उपस्थित राहत आपल्या समस्या मांडून वीज नियामक मंडळासमोर आवाज उठवायला हवा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाने केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढीव वीज बिले, अतिरिक्त अधिभार, मीटर बंद असणे तसेच विज वितरण कंपनीच्या कामांबाबत असलेल्या विविध तक्रारी यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा व्यापारी संघाच्या माध्यमातून सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर मध्ये येथील ग्राहक मेळावा १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजता आयोजित करण्यात आला असून यावेळी ग्राहकांनी उपस्थिती लावून आपल्या समस्या व तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही आयोजित पत्रकार परिषदेत व्यापारी संघटनेच्या पदाधिकार्यांकडुन करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संजय भोगटे, व्दारकानाथ घुर्ये, सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, किरण सिध्दये,बाळ बोर्डेकर, श्रीपाद चोडणकर, संदेश परब, नंदन वेंगुर्लेकर, राजन नाईक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी ग्राहक मेळावा आयोजित करण्याचे ठरल्यानंतर विज वितरणच्या अधिकार्यांकडुन म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्राहकांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही, अशी नाराजी उपस्थित पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
यावेळी संजय भोगटे म्हणाले, जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या लक्षात घेता नियमानुसार अशा प्रकारचे मेळावे होत नाहीत. त्यामुळे आमच्या संघटनेने पुढाकार घेवून प्रत्येक तालुक्यात हे मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवार १६ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी होणार्या मेळाव्यात उपस्थित राहून येथील ग्राहकांची आपल्या प्रश्नावर चर्चा करणे गरजेचे आहे.
या मेळाव्यात वाढती बिले, मिटर बाबत तक्रारी, अतिरिक्त भार आदी विषयावर अधिकार्यांकडुन दिली जाणारी सेवा यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत जे प्रश्न सुटणार नाहीत, असे प्रश्न घेवून आम्ही महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांचे लक्ष वेधणार आहोत. त्यामुळे या मेळाव्याला सर्व ग्राहकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुका व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर म्हणाले, वीज ग्राहकांच्या लहान सहान तक्रारी असतात त्या दूर झाल्या पाहिजेत. तसेच तालुक्यातील ग्राहकांनी उपस्थित राहून समस्या, तक्रारी मांडल्या पाहिजेत. व्यापारी संघाच्या वतीने ग्राहकांना एकत्रित तक्रारी दाखल करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येकाने उपस्थित राहावे.तसेच सावंतवाडी उप तालुक्यातील आरोंदा, तळवणे, सातार्डा, साटेली, कवठणी, किनळे, मुळेवाड, नेमळे अशी गावे वेंगुर्ले उपविभागात जोडण्यात आली आहेत. ती वीज मंडळाने सावंतवाडी तालुक्यात समाविष्ट करून तालुक्यातच त्यांची गाऱ्हाणी ऐकली पाहिजेत.
यावेळी नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, वीज ग्राहकांच्या तक्रारीवर निवारण झाले पाहिजे. तसेच यासंदर्भात वीज नियमन मंडळाकडे देखील तक्रारी दाखल करायला पाहिजेत त्यांची देखील मुदत जाणून घेऊन प्रत्येक ग्राहकाने सतर्क व्हावे.
जिल्हा व्यापारी संघाच्या या प्रयत्नांना वीज कंपनी आणि अधिकारी सहकार्य करतील त्यांनी सहकार्य केले नाही तर हा राज्यस्तरावर व राज्य नियामक मंडळासमोर विषय नेला जाईल आणि ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे यावेळी संजय भोगटे यांनी सांगितले.
Sindhudurg