तर हायवे प्राधिकरण आणि ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार – दया मेस्त्री

हळवल फाट्यावर हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार आणखी किती बळी घेणार?

कणकवली I मयुर ठाकूर : हळवल फाट्यावरील त्या जीवघेण्या वळणावर पुन्हा अपघात होऊन कुणाचा प्राण गेला, तर हायवे प्राधिकरण व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्‍हा उपाध्यक्ष दया मेस्त्री यांनी आज दिला. तसेच हळवल फाट्यावर हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार आणखी किती लोकांचे बळी घेणार? असा प्रश्‍नही त्‍यांनी उपस्थित केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना दया मेस्त्री म्‍हणाले की, मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे चुकीच्या पद्धतीने वळण ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा वाहन चालकांचा जीव येथील चुकीच्या रस्त्यामुळे गेला आहे. तरीही येथील अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभाग आणि ठेकेदाराला जाग आलेली नाही. मात्र येथील वळणावर पुन्हा अपघात होऊन कुणाचा जीव गेला तर आम्‍ही हायवे अधिकारी अाणि रस्ता ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्‍याशिवाय राहणार नाही. तसेच पुन्हा असे काही अपघाती प्रकार घडले तर हायवे प्राधिकरण व ठेकेदाराला जिल्ह्यात फिरुच देणार नाही. त्यांना मनसे स्टाईलने जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देऊ.

Daya Mestri will file a case of manslaughter against the highway authority and the contractor

श्री.मेस्त्री म्‍हणाले, कणकवली शहरातील उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत असताना तेथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची भूमिका देखील ठाम दिसत नाही. प्रशासन यंत्रणा फक्त अपघात झाले, अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर आपले सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तत्काळ धावून येते मात्र लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता दिसत नाही. तसेच या अवघड वळणावर कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा इशारादायक सिग्नल, हायमास्ट ची व्यवस्था अद्यापही केलेली नाही ती तत्काळ करून वाहनचालकांचा प्रवास सुखकर करण्यास प्रशासन यंत्रणेने मदत करावी. अन्यथा जनतेच्या हितासाठी मनसे रस्त्यावर उतरेल.
मेस्त्री म्‍हणाले, जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने याकडे ज्याप्रमाणे जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते त्याप्रमाणे या समस्येकडे सुद्धा लक्ष देऊन जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. महामार्ग वाहतूक पोलीस नियंत्रण यंत्रणा यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ठिकठिकाणी सामान्य नागरिकांच्या गाड्या तसेच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या अडवून दंड वसुली करण्यात व्यस्त आहेत मात्र अपघातप्रवण क्षेत्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची दक्षता घेतली जात नाही. त्याचप्रमाणे आरटीओ देखील पूर्णपणे अनियंत्रीत असल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा बऱ्याच वाहनचालकांचे अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. याकडे आता नवीन पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे. अशी खंत यावेळी मेस्त्री यांनी उपस्थित केली आहे.