बांद्यात बेकायदा दारूसह १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त 

इन्सुली उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

बांदा l प्रवीण परब :मुंबई – गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कारवाई केली. या कारवाईत २ लाख २४ हजार ४०० रुपयांची दारू व ८ लाख रुपयांची कार असा एकूण १० लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी प्रेम शामलाल पंजवाणी (२८) व राहुल अशोक पाटील (३४, दोघेही रा. कोल्हापूर) याना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत विविध ब्रॅण्डचे ३१ बॉक्स जप्त करण्यात आलेत.

 

दारू वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा कार (एमएच ०९ एफबी ५१२९) जप्त करण्यात आली. सदर कारवाई जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान रणजित शिंदे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी व अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.