लांजा (प्रतिनिधी) लांजा बस स्थानकातील प्रसाधनगृहातील (मुतारी व शौचालय) घाणीचे सांडपाणी झिरपुन बसस्थानकाच्या लगत असणा-या घरांच्या परिसरात जात असल्यामुळे दुर्गंधी पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरीक मुस्ताक वणू यांनी लांजा नगरपंचायतीकडे केली आहे.
लांजा बस स्थानकाची जागा प्रशस्त
असल्याने बसस्थानकातील प्रसाधने गृहाचे पाण्याची स्थानकाचे आवारात शोष खड्याद्वारे विल्हेवाट लावणे आवश्यक असताना हे घाणीचे पाणी सोडून देण्यात आल्याने सदर पाणी बाजूच्या घराच्या परिसरात झीरपत शिरत आहे याचा त्रास येथील नागरिकांना होत आहे.
लांजा बस स्थानकाशेजारी वस्ती आहे. बस स्थानकातील असणारे प्रसाधन ग्रृहाचे टाक्या ओव्हर फ्लो होवून मलमुत्राचे पाणी परिसरात वहात आहे.
सदर घाणिचे पाणी झीरपून बाजूच्या इमारतीच्या परिसरात जात आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याला धोकादायक आहे. सदर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत वारंवार संबधित अधिकारी व आरोग्य अधिकारी लांजा यांना लेखी कळविले असुन कोणतीही कार्यवाही नाही. कित्येक दीवस या दुर्गंधीयुक्त पाण्याचा येथील नागरिकांना त्रास होत असल्याचे वणू यांनी म्हटले आहे












