कालवा रस्त्याला संरक्षक भिंतीच्या मागणीसाठी कुडासेत स्थानिकांचे उपोषण

तिलारी कालवा विरोधात संताप

दोडामार्ग : प्रवीण परब :   कुडासे – भोमवाडी येथे जाणाऱ्या कालव्याला संरक्षक भिंत उभारावी या मागणीसाठी आज कुडासे ग्रामस्थांनी उपोषण केले. महिनाभरापूर्वी याच ठिकाणी कार कालव्यात कोसळून महिलेचा नाहक बळी गेला होता. तिलारी पाटबंधारे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. संबंधित विभाग आणखी बळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांनी केला.

 

कुडासे भोमवाडी येथे जाणाऱ्या मार्गालगत तिलारी कालवा आहे. कालव्यावरून जाणाऱ्या मार्गाला संरक्षक भिंत उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक अपघात होत असतात. महिनाभरापूर्वी रस्त्यावरून कार थेट कालव्यात कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्या जेनिफर लोबो यांनी तिलारी कालवा विभागाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली होती. अन्यथा १५ जानेवारी रोजी कालव्या ठिकाणी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज उपोषण छेडण्यात आले.

 

यावेळी जेनिफर लोबो यांनी तिलारी कालवा विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. माहेरवाशीण महिलेचा बळी जाऊनही संबंधित विभाग अद्याप जागा झालेला नाही. या मार्गावरून ग्रामस्थांसह शाळकरी मुले प्रवास करतात. कालव्या वरील परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. असे असतानाही तिलारी कालवा विभागाला याचे सोयरसुतक नाही, असा संताप व्यक्त केला.

 

यावेळी विनिता घाडी, नयनी शेटकर, रेश्मा शेख, राजन गावडे, शिला फर्नांडिस, रजिया नाईकवडी, लुसी लोपिस, दीपक जाधव, मदन राणे, निथ्या लोप्स, कामिल लोबो, समीक्षा पवार, जोस्टन लोप्स, सर्वेश हळनकर, मुकेश बास यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.