सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या वार्षिक कला प्रदर्शनास प्रारंभ
स्वर्गीय गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान
चिपळूण ( प्रतिनिधी ):- सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून मन आनंदी बनले. येथील विद्यार्थी घेत असलेली मेहनत पाहता, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. येथील केवळ चित्रेच नव्हे, तर सर्व शिल्प देखील बोलकी आहेत. राज्य कला प्रदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड होणे, हेच या कला महाविद्यालयाचे खरे यश आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील चित्रकार बबन माने यांनी केले. सह्याद्री कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उदघाटन १५ जानेवारी रोजी संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात चित्रकार माने हे बोलत होते.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून उद्योजक प्रशांत गोविंदरावजी निकम यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार बबन माने, चित्रकार विजय उपाध्ये ,शिल्पकार संदीप ताम्हणकर, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, अनिरुद्ध निकम, ऑलिव मर्चंड हे उपस्थित होते.यावेळी बोलताना माने पुढे म्हणाले की, बबन माने -२००४ साली मी आलो होतो त्यानंतर आता हे कलामहाविद्यालय पाहून मी थक्कच झालो. शहरी विद्यार्थ्यां प्रमाणेच हे देखील विद्यार्थी कलेच्या दृष्टीने पुढारलेले आहेत.
तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा गौरव सलीम अल्लाबक्ष मणेरी कलाशिक्षक यांना प्रशांत निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती सलीम मणेरी यावेळी बोलताना म्हणाले की, माझा सन्मान होणे मी भाग्यच समजतो. याचे सर्व श्रेय घरच्या मंडळीना देतो. मुलांना सोप्या पद्धतीने शिकवणे. प्रात्यक्षिकदाखविणे यामुळे माझे विद्यार्थी हे कला क्षेत्रात तरबेज झाले आहेत .
शिल्पकार संदिप ताम्हणकर आपल्या मनोगतात म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलाकृती परीक्षण करताना खूप काही शिकायला मिळाले. परीक्षण करताना माध्यमाचा विचार केला. या व्यावसायिक स्पर्धेत डिजिटल युगात जगत असताना आपण कसे टिकून राहू , हे पाहिले पाहिजे.
यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के आपल्या मनोगतात मिळाले की, विद्यार्थी वर्षभर घेत असलेली मेहनत त्यांच्या कामातून आपल्याला या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी केलेली कामे कलारसिकांना खरेदी करण्याची सोय देखील या ठिकाणी करण्यात आल्याने कला रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राजेशिर्के यांनी केले. सह्याद्री कला महाविद्यालयात घडणारे कलाकार हे स्वतःच्या वेगळ्या शैलीत काम करत असल्याने, ते राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटवतात याचा आम्हाला अभिमान आहे असे राजेशिर्के यांनी नमूद केले.
या प्रदर्शनात शंभरहून अधिक कलाकारांच्या ५००हून अधिक कलाकृती मांडल्या आहेत.तसेच १५ फूट उंचीची नटराज मूर्ती नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता म्हणून नटराज या रूपात शिवाचे महत्त्व आहे.या कलाप्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन व कौतुकाची थाप म्हणून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते.












