कष्ट, सातत्य व इच्छाशक्ती जीवन घडविते -डॉ. तात्याराव लहाने
चिपळूण (प्रतिनिधी):– -जीवनात अनेक अडचणी येत असतात त्या सर्व अडचणींचा सामना करून आपले उज्वल भविष्य घडण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली आवड,स्वप्ने निश्चित करा. आवश्यक कौशल्य विकसित करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. आवडीचे मार्ग निवडा.स्वतःच्या इच्छाशक्तीवर नियोजनपूर्वक मार्गक्रमण केले तर आपण यशाला गवसणी घालू शकतो पण यासाठी कष्ट, सातत्य व इच्छाशक्ती अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते पद्मश्री, नेत्ररोग तज्ञ डॉ.तात्याराव लहाने यांनी केले.
याप्रसंगी विचारमंचावर नेत्ररोग तज्ञ तात्याराव लहाने,उद्योजक मंदार भारदे, ऑलिव्हर मर्चंड, संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, डी वाय एस पी राजेंद्र राजमाने, पोलीस उपनिरीक्षक जयंत गायकवाड, सचिव महेश महाडिक, विश्वस्त शांताराम खानविलकर, मानसिंगराव महाडिक, चंद्रकांत सुर्वे,मारुतराव घाग,संस्थेचे सर्व पदाधिकारी,उद्योजक प्रशांत निकम, माजी प्राचार्य व जीवन कला गौरव पुरस्कार प्राप्त प्रकाश राजेशिर्के, उदोजक प्रदीप निकम, माजी सभापती पूजाताई निकम, युगंधरा राजेशिर्के, अंजलीताई चोरगे, डॉ. निखिल चोरगे,निकम कुटुंबातील सर्व सदस्य, सावर्डे गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस जयद्रथ खताते,तालुकाध्यक्ष अबुशेठ ठसाळे, दशरथ दाभोळकर,राकेश चाळके, जिल्हा परिषद सदस्य दिशा दाभोळकर, पंचक्रोशीतील राजकीय,क्रीडा, सांस्कृतिक शैक्षणिक, सहकार, क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक,पंचक्रोशीतील कार्यकर्ते,पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे आमदार शेखर निकम यांनी स्वागत केले.
या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित मी कसा घडलो या आपल्या व्याख्यानात डॉ. तात्याराव लहाने यांनी शिका आत्मचिंतन करा, आपला मेंदू जागा ठेवा त्याला सतत खाद्य द्या. त्यामुळेच अडचणीवर मात करण्याची शक्ती निर्माण होते. प्रत्येक कामाचे नियोजन करा त्या नियोजनुसार सतत अभ्यास करा परीक्षेत मार्क्स मिळण्यासाठी अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करा. सामाजिक भान जपा. अविरत कष्टानेच आपण प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो याची जाणीव करून दिली. त्याचबरोबर उपस्थितीना मोबाईलचे दुरुपयोग हसत खेळत सांगून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. दररोज व्यायाम करा. आरोग्याकडे लक्ष द्या याचीही जाणीव करून देतानाच इतरांचे शुभाशीर्वादच आपल्याला जगण्याची उमेद देतात. विज्ञानापलीकडे जाऊन हे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो याची कल्पना दिली.आपल्या जीवनातील अनेक कटू, सत्य व वाईट अनुभव विविध उदाहरणांच्या आधारे विद्यार्थ्यांना व उपस्थितांना सांगून एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम डॉ.तात्याराव लहाने यांनी या प्रसन्न केले.
याप्रसंगी कर्तव्यपथ या माहितीपटाचे उद्घाटन डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या शुभहस्ते तर सह्याद्री शिक्षण संस्थेच्या ॲडव्हान्स वेब न्यू पोर्टल चे प्रकाशन उद्योजक मंदार भारदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्योजक मंदार भारदे यांनी व्यवसाय पंथे चालावे या आपल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना जीवनात नेहमी आपल्याला जे आवडते तेच करा. आपल्या वडिलोपार्जित स्वप्ने पूर्ण करण्यापेक्षा स्वतःला जे आवडते ते करा त्यामुळे आपणास आपल्या कामाचा कंटाळा येणार नाही. ध्यास, आवडच सर्वोत्कृष्ट निर्मिती करते म्हणूनच स्वतःचे मार्ग स्वतः निवडा. स्वतःसाठी जगा त्यातच तुमचे यश आहे हे सांगतानाच नोकरीपेक्षा व्यवसायामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्ती करता येते स्वतःच्या मर्जीनुसार जीवन जगता येते याची जाणीव उपस्थितांना करून दिली.
सह्याद्री शिक्षण संस्था प्रतिकूल परिस्थितीमध्ये निर्माण झाली व ती आजपर्यंत तेवढ्याच नावलौकिकाने व सचोटीने मार्गक्रमण करत असून यासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी ऋण व्यक्त केले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी कला,क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारी बद्दल समाधान व्यक्त करून यापुढे विद्यार्थ्यांच्यातील गुणवत्ता टिकून राहण्यासाठी प्रत्येक परिवारातील घटकांने प्रयत्न करण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविकात आमदार शेखर निकम यांनी केले. संस्थेसमोर असणाऱ्या भविष्यातील विविध योजनांचाही परामर्श त्यांनी घेतला व सामाजिक भान जपणारा विद्यार्थी निर्माण करण्यावर सह्याद्री मुख्यत्वे भर देत आहे याची माहिती उपस्थित त्यांना दिली.
चिपळूण शहरातील गोवळकोटच्या राजे सामाजिक प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीचे भान जपून अनेकांना अडीअडचणीत सहकार्य केले आहे त्यांच्या या कार्याची देखील घेऊन याप्रसंगी .रु.25000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन 2025 चा शिक्षण महर्षी गोविंदराव निकम सह्याद्री पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत म्हणाले, रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण इत्यादी कामापासून सुरू झालेले प्रतिष्ठान आज गड संवर्धन पुरातन वस्तूंची जतन व त्यांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी झगडत आहे त्याला काही प्रमाणात यशही आले आहे. गडकिल्ल्यांवर असणाऱ्या अनेक वास्तूंचे जतन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करून त्यांचा आदर्श समाजामध्ये रुजवण्याचे कार्य करत आहे. ध्येयाने प्रेरित होऊन सर्वसामान्य कुटुंबातील तरुण एकत्र येऊन हे काम अविरतपणे करत आहेत याचा आम्हाला आनंद आहेच मात्र अशा मोठ्या संस्थेने आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या केलेला सन्मान नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे अशी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त सचिन शेंबेकर,निलेश घाग, नेहा बागवे, विद्यावाचस्पती (पीएचडी)पदवी प्राप्त नमिता बोंडे,हरिश्चंद्र भागडे, ऑस्ट्रेलियात कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेले अनिरुद्ध निकम, सुवर्णपदक प्राप्त सेजल शिंदे, शिल्पकलेत प्रथम क्रमांक प्राप्त विशाल गोवळकर विशेष पुरस्कार प्राप्त विशाल म्हसणे, तनवी सुर्वे, रूपाली पटेल उदयराज गराडे,गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची नॅशनल अबॅकस मध्ये एक लाख रुपये ची विजेती गार्गी घडशी, नॅशनल रायफल शूटिंग यश प्राप्त यश सावंत, राज्य धावणे स्पर्धेत यशस्वी विद्यार्थिनी हमेरा सय्यद, राज्य कबड्डी संघात सहभागी शुभम नवरंग यांचा प्राथमिक स्वरूपात सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन तुषार बिजीतकर व हरिचंद्र भागडे यांनी केले.










