राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील सागवे येथील प्रसिध्द श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी विविध ठिकाणांहून मोठ्यासंख्येने भाविक येत असतात. त्यांच्या सोयीकरीता राजापूर एस.टी. आगारातून स्पेशल गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड, विजयदूर्ग आगारातूनही गाड्या सोडण्यात येणार आहेत.
तालुक्यातील सर्वात मोठी यात्र म्हणून सागवे येथील श्री कात्रादेवीच्या यात्रेचा नावलौकीक आहे. या यात्रा काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून मोठ्यासंख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी ही यात्रा होत असून ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येणाऱया भाविकांच्या सेवा सुविधांबरोबरच यात्रेत येणारे व्यावसायिक यांना दुकान गाळे व योग्य जागा उपलब्ध करून देणे, जागेची सफाई करणे, रस्त्यांची सफाई व डागजुगी आणि सुशोभिकरण करणे, यात्रास्थळी येणाऱया वाहकांची पार्कींग व्यवस्था व वाहतूक व्यवस्था करणे यांसारखी कामे ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.
दरम्यान भाविकांना यात्रास्थळी जा-ये करण्यासाठी राजापूर एस.टी. आगाराकडून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कात्रादेवी वाडी ते यात्रा ठिकाण- दोन गाड्या शटल फेऱया, कात्रादेवी ते पुंभवडे-हरचेरी-तारळ-दोन शटल फेऱया, कात्रादेवी ते पुंभवडे-नाणार-दोन गाड्या शटल फेऱया, राजापूर ते कात्रादेवी यात्रा डोंगरमार्गे-चार गाड्या शटल फेऱया, रत्नागिरी-जैतापूर डोंगरतिठा मार्गे यात्रा, राजापूर ते कात्रादेवी यात्रा हातिवले मार्गे दोन गाड्या शटल फेऱया अशाप्रकारे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
शिरसे-धाऊलवल्ली या रात्रवस्तीच्या गाड्या ४५ प्रवाशांच्या उपलब्धततेनुसार त्या-त्या ठिकाणावरून यात्रा ठिकाणी जादा फेऱया करणार आहेत. यात्रेसाठी प्रवास करणाऱया महिलांसाठी महिला सन्मान योजनेंतर्गंत हाफ तिकीट, अमृत जेष्ठ नागरकीरांसाठी मोफत प्रवास, जेष्ठ नागरीक हाफ तिकीट या सवलती लागू राहणार आहेत. कात्रादेवी मार्गनिवारा आणि यात्रेच्या ठिकाणी स्वतंत्र नियंत्रण कक्षही एस.टी.आगाराकडून उभारण्यात येणार आहे. या सुविधेचा प्रवाशांसह यात्रेकरूनी लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.












