तक्रारी करूनही कारवाई नाही
महसूल प्रशासनाची बघ्याची भूमिका
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यात अर्जुना नदीपात्रात पुर्व भागातील काही भागांसह गोठणे दोनिवडे, शिळ, उन्हाळे परिसरासह धाऊलवल्ली परिसरात मोठया प्रमाणावर राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी करूनही महसूल प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. महसूल प्रशासनाच्या या बघ्याच्या भूमिकेमुळे राजापूरातील अशा अणसूरेतील कच उत्खनन, बेकायदा वाळू उत्खननाला महसूल प्रशासनाचाच आशिर्वाद असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतुन उमटत आहेत.
प्रशासनाच्या या बोटचेप्या धोरणामुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडत असून सर्व सामान्य जनतेची छोटया छोटया कामांसाठी अडवणून करणाऱ्या महसूल प्रशासनाला हे बेकायदा वाळू उत्खनन दिसत नाही काय असाही सवाल जनतेतुन उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात अणसूरे खाडीत बेकायदा कच उत्खनन प्रकरणी प्रसिध्दी माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणी तहसीलदारांनी पहाणी करून अहवाल प्रांताधिकारी यांना सादर केला आहे. प्रत्यक्षात मात्र अद्यापही या व्यावसायिका विरोधात कारवाई झालेली नाही.
आता तर तालुक्यात अर्जुना नदीपात्रात पुर्व भागातील काही भागांसह गोठणेदोनिवडे, शिळ, उन्हाळे परिसरासह धाऊलवल्ली परिसरात मोठया प्रमाणावर राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. अगदी राजरोसपणे दिवसा व रात्री हे उत्खनन केले जात आहे. शहरापासून अगदी दोन ते तीन किलोमिटर अंतरावर महामार्गावर नदीपात्रात गाडया लावून हे उत्खनन केले जात आहे. मात्र प्रशासनाने डोळयावर पट्टी बांधल्याने त्यांना काहीच दिसत नाही अशी सध्या तालुक्यात परिस्थिती आहे.
याबाबत काही जागरूक नागरिकांनी प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर अशा प्रकारे या या भागांमध्ये बेकायदा वाळू उत्खनन सुरू असल्याचे मेसेजही टाकले आहेत. मात्र त्याचीही दखल या ग्रुपमध्ये असलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेली नाही. अवैध व विनापरवाना वाळु उत्खनना विरोधात एकही कारवाई प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आशीर्वादानच अशा प्रकारे तालुक्यात हे अवैध व विनापरवाना वाळु उत्खनन सुरू आहे. आमचे कुणीच काही करू शकत नाही अशा थाटात हे वाळू व्यावसायिक प्रशासकिय कार्यालयांसह आपल्या परिसरात वावरत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना नियमांवर बोट ठेऊन पिळवणूक करणाऱ्या महसूल प्रशासनाने जरा या अवैध व विनापरवाना वाळु उत्खननाकडे लक्ष द्यावे आणि कारवाईची धमक दाखवावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.











