कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड जागेची फेर तपासणी करण्याचे जिल्हा सहआयुक्त यांचे आदेश
लांजा (प्रतिनिधी) २०१६ च्या निकषाप्रमाणे कोत्रेवाडीतील जागा डंपिंग ग्राउंड साठी योग्य नाही. त्यामुळे या जागेची फेरतपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा सह आयुक्त रत्नागिरी यांनी राजापूर तहसीलदार यांना दिल्या असल्याची माहिती उल्का विश्वासराव यांनी आज बुधवारी लांजा रेस्टहाऊस येथील पत्रकार परिषदेत दिली .
दरम्यान, आता जिल्हा प्रशासनानेच कोत्रेवाडी येथील जागेची फेर तपासणी करण्याचे आदेश दिल्याने उल्का विश्वासराव आणि कोत्रेवाडी येथील ग्रामस्थ यांनी गेल्या चार वर्षांपासून छेडलेल्या लढ्याचे हे यश म्हणावे लागेल
लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे वस्तीलगत डम्पिंग ग्राउंड (घनकचरा) प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाच्या सर्व अटी शर्तींची पायमल्ली करून जोर जबरदस्तीने कोत्रेवाडी ग्रामस्थांना देशोधडीला लावण्यासाठी हा प्रकल्प अगदी लोक वस्तीला लगत म्हणजे १०० मीटर अंतरावर राबवण्यात येत आहे .विशेष बाब म्हणजे या प्रकल्पाकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ता नाही, पाण्याचे जलस्रोत आहेत. या सर्व बाबी पायदळी तुडवून प्रशासनाकडून हा प्रकल्प राबवला जात असल्याने गेल्या चार वर्षांपासून कोत्रे्वाडी ग्रामस्थांनी या विरोधात लढा पुकारला आहे. नेत्या उल्का विश्वासराव यांनी देखील ग्रामस्थांच्या बाजूने ठामपणे उभे राहत हा डंपिंग प्रकल्प हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अनेकदा आंदोलन उपोषणाचे मार्ग देखील ग्रामस्थांनी पुकारलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, मुळातच कोत्रेवाडी येथे राबवण्यात येणार प्रकल्प हा पूर्णपणे चुकीचा आहे. शासनाच्या कोणत्याही निकषात तो बसत नाही. हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प कोत्रेवाडी येथून हद्दपार व्हावा यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्या दालनात ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक देखील पार पडली होती. यावेळी ग्रामस्थांनी हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प लोकवस्ती पासून जवळ आहे आणि तो लोकांना कसा देशोधडीला लावणार आहे ही बाजू त्यांनी प्रशासनाकडे मांडली होती. तर आपण देखील वेळोवेळी जिल्हाधिकारी, लांजा तहसीलदार, प्रांताधिकारी, न.पं.मुख्याधिकारी
यांची भेट घेऊन लोकांची रास्त बाजू आपण त्यांच्यासमोर मांडली होती. तर जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत याबाबत फेर तपासणी करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी देण्याचे सूचित केले होते.
यानुसार आता जिल्हा सहआयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी तुषार बाबर यांनी
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडची जागा ही शासनाच्या 2016 च्या निकषाप्रमाणे नाही. सदर जागा ही डम्पिंग ग्राउंड साठी अयोग्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने सदर जागेची फेर तपासणी करण्यात येऊन त्याचा अहवाल लांजा नगरपंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास एका महिन्याच्या आत सादर करावा असे या पत्राद्वारे राजापूर तहसिलदार यांना सुचित करण्यात आले आहे
अशाप्रकारे आता जिल्हा सह आयुक्तांनीच सदरची जागा निकशात बसणार नसल्याचे सांगत फेर तपासणी करण्याचे आदेश राजापूर तहसीलदार यांना दिले आहेत. तसेच जोपर्यंत हा प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत आपण ग्रामस्थांच्या सोबत राहणार असल्याचे नेत्या उलका विश्वासराव यांनी यावेळी सांगितले .
या पत्रकार परिषदेला विश्वासराव यांच्यासह ग्रामस्थ मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर हे देखील उपस्थित होते
चौकट- चुकीच्या पद्धतीने करण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंड विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थांनी दिनांक २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोत्रेवाडी
येथील डम्पिंग ग्राउंड प्रकल्पाच्या जागेची फेर तपासणी करण्याचे पत्र ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी यांचा मान ठेवून ग्रामस्थांनी २६ जानेवारी चे आपले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.










