एकाच्या वन कोठडीत वाढ : अन्य तिघांची झाली चौकशी
वेंगुर्ले : दाजी नाईक
शिरोडा परिसरात दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांना वनविभागाने सापळा रचून मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. त्या चौघांना न्यायालयाने चार दिवस वनकोठडी दिली होती. त्याची मुदत आज संपली असता वनविभागाने पुन्हा त्यांना आज न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने तिघांचा जामीन मंजूर केला. मात्र एकाच्या वन कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणी वनविभागाचे अधिकारी कसून तपासणी करत असून शेवडा परिसरातील आणखी तिघांची चौकशी करण्यात आली आहे.
वनविभागाने १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ही मोठी कारवाई शिरोडा येथे करून रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या धाडसी कारवाईत रणजित रामचंद्र नायर, वय ४० वर्षे, रा. परबगाव शिरोडा, गुरुनाथ नाईक वय ७० वर्षे रा. परबगाव शिरोडा, विभव आडारकर, वय ३५ वर्षे, रा. शिरोडा ता. वेंगुर्ला आणि निलेश मनोहर पांडजी वय ३३ वर्षे, रा. रेडी. ता. वेंगुर्ला यांना संशयीत आरोपी म्हणून अटक करण्यात आलेले होते. त्याच बरोबर त्यांच्या ताब्यातून सुमारे ७ कोटी रुपये किमतीचे ९.१२० कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आलेल होते.
गुन्हा दाखल करून त्या चौघांना वनविभागाने न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही जणांना चार दिवसाची वन कोठडी दिली होती. ही मुदत संपल्यानंतर आज सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात रणजित रामचंद्र नायर, गुरुनाथ नाईक आणि विभव आडारकर यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र निलेश मनोहर पांडजी याच्या वन कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. वनविभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून या प्रकारात अजून कोण आहेत का याची चौकशी सुरू आहे. शिरोडा परिसरातील अजून तिघांची वनविभागाकडून चौकशी करण्यात आली आहे.












