खंडाळा । वार्ताहर : जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत दि मॉडेल संघाच्या संघाने आघाडी घेवुन चार खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर धडक दिली आहे. यामध्ये कु. प्रिया मंदार अजगोलकर, कु. अंतरा अनंत वरवटकर, कु. रिया कैलास पावसकर व कु. नंदीनी रवींद्र जाधव या खेळाडूंचा समावेश झाला आहे.
दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे शाळेच्या चार विद्यार्थिनी आता राष्ट्रीय डॉजबॉल संघातून खेळणार ही अत्यंत जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. सैतवडे सारख्या लहान गावातून अनेक अडचणीवर मात करत संघात आपल्या चार विद्यार्थिनींची निवड होणे ही खूप अभिमानाची बाब आहे. या आणि सर्वच मुलींच्या संघानी आपल्या शाळेचे, आपल्या आई वडीलांचे तसेच आपल्या गावाचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. या संघाच्या कोच शाळेच्या शिक्षिका श्रीमती ऋतुजा राजेश जाधव यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. शाळेचे मुख्याध्यापक विलास कोळेकर यांचे या संघाला विशेष सहकार्य लाभले. तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सुद्धा चांगले प्रोत्साहन लाभले आहे. या संघाचे व यशस्वी मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.












