औरंगजेब फॅनक्लबचे प्रमुख उद्धव ठाकरे ‘दगाबाज’

मंत्री आशिष शेलार यांची घणाघाती टिका : फक्त हिरवी मते मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा खटाटोप सुरु

मालवण | प्रतिनिधी : दगाबाज म्हणून ओळख असलेल्या उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅनक्लब प्रमुख हीच उपाधी योग्य आहे. अशी बोचरी आणि घणाघाती टिका मुंबई भाजपा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

ज्यांनी कुटुंबासोबत दगा केला, ज्यांनी मित्रपक्षासोबत दगा दिला. ते उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीसोबत दगा करतील. यांच्या सोबत असणारे आमदार, खासदार, नगरसेवक व अनेक पदाधिकारी त्यांना सोडून जात असताना त्यांची अवस्था शोले सिनेमामधील असरांणी सारखी म्हणजे सोबत कोणीच नाही अशी होईल. असेही टिकास्त्र मंत्री आशिष शेलार यांनी सोडले.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर नांदोस येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री आशिष शेलार यांनी नांदोस कट्टा येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, उपासरपंच विजय निकम, कट्टा सरपंच शेखर पेणकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे ताकद, ऐपत आणि औकात यां पेक्षा जास्त वल्गना करत आहेत. सोबत असलेले सगळे सोडून जात असताना त्यांनी त्याचा विचार करावा. आमच्या नेत्यांवर टिका करण्याचा प्रयत्नही करू नये. गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी केलेली टिका म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न.

उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत जनतेने नाकारले. त्या पराभवाचे वळ अजूनही त्यांच्या शरीराच्या कुठल्या भागावर आहेत हे त्यांनी आरश्यात पाहावे.

मुंबई महानगर पालिकेच्या कमिशनवर कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत मुंबईतील जनता मूठमाती देईल. दोन अंकी संख्या जरी यांच्या नगरसेवकांची येणार नाही. अशी स्थिती जनताच निर्माण करेल. असेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

हिरवी मते मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा खटाटोप

भाजपा, जनसंघ व आमचे नेते यांच्या विरोधात उद्धव ठाकरे करतं असलेली भाषणे म्हणजे हिरवी मते आपल्याला मिळावीत यां हेतूने चाललेला हा खटाटोप आहे. मुस्लिम मतांचे लांघूनचालन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत पाहावे. आम्ही मागून वार करणारे नाही तर समोर वार करून जनतेच्या आशीर्वादाने निवडूक जिंकणार. असाही विश्वास मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला.