दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीपकड मोहीम राबविणार

वनमंत्री गणेश नाईक यांचे वनविभागाला आदेश ; आ. दीपक केसरकर यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एकदा हत्ती पकड मोहिम राबविण्याचा निर्णय वनमंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. लवकरच याची अमंलबजावणी केली जाणार आहे, याबाबत चा पाठपुरावा स्वता आमदार दीपक केसरकर यांनी केला असून वनमंत्री गणेश नाईक यांनी तसे आदेश वनविभागाला दिले आहेत, अशी माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली.

दोडामार्ग तालुक्यात सातत्याने होत असलेल्या हत्तींच्या नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी वनमंत्र्यांसमवेत याबाबत चर्चा केली. यावेळी हत्ती पकड मोहिम पुन्हा राबविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षकांना दिल्या.मात्र, पकडलेले हत्ती कर्नाटकात सोडावेत की हत्तीग्राम उभारावा याबाबत अद्याप पर्यत निर्णय झालेला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सध्या पाच हत्तींचा कळप आहे या हत्तींनी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे सततच्या नुकसानीला स्थानिक ग्रामस्थ चांगलेच वैतागले असून वेळोवेळी आंदोलने ही केली आहेत. मात्र, वनविभाग ह्या हत्तींना नुकसानीपासून परावृत्त करते पण हत्तींची समस्या कायम मिटू मिटवत नाही. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून हत्ती हटाव मोहीम राबविण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. पण या मागणीला यश येत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली होती.

अखेर आमदार दीपक केसरकर यांनी या प्रश्नात तोडगा काढत थेट वनमंत्री गणेश नाईक यांना साखळी घातले. त्यानंतर आता हत्ती पकड मोहीम राबवण्याबाबत वन विभागाच्या स्तरावर चर्चा सुरू झाली आहे