कर्जप्रकरणी अवाजवी परतावा मागणाऱ्या फायनान्स कंपनी विरोधात ‘ धरणे आंदोलन ‘

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा  

तोडगा काढण्याच्या लेखी आश्वासनाअंती आंदोलन स्थगित 

सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे येथील शामसुंदर मालवणकर यांच्या वाहन कर्जप्रकरणी एका फायनान्स कंपनीने तब्बल ६९ लाख रुपये रकमेच्या आकारलेल्या परताव्याचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीने सदर फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर रस्त्यावर उतरत मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. अखेर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता फायनान्स कंपनी व्यवस्थापनाकडून आंदोलकांची भेट घेत दिलेल्या लेखी आश्वासना अंती हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाकडून ‘कर्ज प्रकरणी जून २०२५ अखेर पर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या कडून करण्यात येईल ‘ असे लेखी आश्वासन आम्हाला दिल्याने तूर्तास हे धरणे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी दिली.

सावंतवाडी शहरातील एका फायनान्स कंपनीने नेमळे येथील श्यामसुंदर मालवणकर या व्यक्तीला कंपनीने दुसऱ्या व्यक्तीकडून कर्ज खाते थकीत प्रकरणी ताब्यात घेतलेला डंपर खरेदी करण्यासाठी ११ लाखांचे कर्ज दिले होते. त्यानंतर सदरचा डंपर मालवणकर यांच्या नावावर करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील २५ हजार रुपये रक्कम त्यांनी सदर कंपनीच्या गोव्यातील व्यवस्थापकाला दिली होती. मात्र तरीही डंपर नावावर न झाल्याने त्यांचे कर्ज थकीत झाले होते. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आपल्या मर्जीतील ऑब्रिटेटर नेमून त्यांना अवाजवी व बेकायदेशीर असा

तब्बल ६९ लाख एवढा भुर्दंड आकारला होता.

आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडे धाव घेत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर समितीने पाठपुरावा करून देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर लोकाधिकार समितीच्यावतीने ११ फेब्रुवारीला शहरातील त्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सावंतवाडी शहरातील संबंधित फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर रस्त्यावर महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांच्यासह कार्याध्यक्ष योगेश वाघमारे,

जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोकरे, जिल्हा संघटक राजेश माने,

जिल्हा उपसंघटक संजय पवार राजेश माने, जिल्हा सचिव डॉ. योगिता राणे, विवेक नाईक आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत संबंधित फायनान्स कंपनीच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. त्यानंतर फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापनाने आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. याबाबत निश्चितच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतल्यानंतर अखेर कंपनी व्यवस्थापनाने ‘शामसुंदर मालवणकर यांच्या कर्ज प्रकरणाबाबतच्या तुमच्या पत्राबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवित आहोत, सदरचे कर्जप्रकरणाचा व्यवहार हा कंपनीसोबत सन २०१३ साली झालेला आहे. सदरबाब आम्ही संबंधित व्यवस्थापनास कळवित आहोत. तरी प्रस्तुत कर्ज प्रकरणी जून २०२५ अखेर पर्यंत तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या कडून करण्यात येईल , ‘ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले