कोमसापतर्फे २२ मार्च रोजी जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे उद्घाटक तर माजी मंत्री आ. दीपक केसरकर स्वागताध्यक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सावंतवाडी येथे २२ मार्च रोजी जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री आ. दीपक केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. तर या संमेलनाचे उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे उपस्थित राहणार आहेत.

कोमसापाचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सावंतवाडी येथे भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोमासापचे जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडी येथे घेण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली असून या पार्श्वभूमीवर हे संमेलन सावंतवाडी येथे होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोमसापतर्फे त्यांना करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे सांगून संमेलनासाठी आपल्याकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही दिली. कोमसापच्या पदाधिकाऱ्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांची भेट घेत त्यांना उद्घाटक म्हणून निमंत्रित केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिक, सांस्कृतिक नाट्य परंपरा आहे. ही परंपरा टिकवण्याचे काम आपले साहित्य प्रेमी करत आहेत. अनेक साहित्यरत्ने या जिल्ह्याने दिली आहेत. त्यामुळे हे कित्येक वर्षानंतर सावंतवाडीत होणारे साहित्य संमेलन आपण सर्वांनी एक होऊन भव्य दिव्य पद्धतीने करूया, असे ना. नितेश राणे यावेळी म्हणाले.

यावेळी कोमसापचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, कोमसाप शाखा सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, नगरपालिकेचे माजी सभापती उदय नाईक आधी उपस्थित होते.

तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार दीपक केसरकर यांची एक मताने निवड करण्यात आली. आपण निश्चितपणे हे संमेलन यशस्वी करूया असे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांनी कोमसापच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. लवकरच संमेलनाच्या नियोजना संदर्भात बैठक घेतली जाणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्याशी संबंधित सर्व संस्था तसेच सर्व घटकांना सहभागी करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य चळवळ अधिक व्यापक करण्याचा उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे. गाव तेथे साहित्य चळवळ अशी संकल्पना या साहित्य संमेलनाची आहे, अशी माहिती यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी दिली.