4 लाख 82 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईत गाठले

रत्नागिरी पोलिसांची कामगिरी; जयगड साखरी येथील फिर्यादीची झाली होती फसवणूक 

रत्नागिरी : प्रतिनिधी
जयगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील साखरी बौध्दवाडी येथील फिर्यादीच्या बँक खात्यातून 4 लाख 82 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोन संशयितांच्या जिल्हा पोलिस दलाने मुंबईतून मुसक्या आवळल्या.

फसवणूकीची ही घटना 17 फेब्रुवारी 2026 ते 9 मार्च 2026 या कालावधीत घडली होती.
दुर्गेश चम्मण रॉय (48,रा.दहिसर पूर्व,मुंबई) आणि अर्जुन रामसूंदर चौहान (38,रा.अजिंक्यनगर कोकणीपाडा दहिसर पूर्व,मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपींबाबत गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त करण्याचे काम सुरु केले होते. त्याप्रमाणे 14 एप्रिल रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे पथकातील पोलिस निरीक्षक अभय तेली व पोलिस अंमलदार पोलिस हवालदार संदेश मोंडे,जयगड पोलिस ठाणे यांनी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व सीसीटिव्ही फूटेजच्या आधारे या दोघांना अटक केली.