खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या व नागरी सहकारी पतसंस्था यांच्या कामकाजामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करत अनंत जाधव, दीपक मोहिते व वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष गिरीश गमरे यांनी शुक्रवारी, २१ रोजी खेडच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. त्यांना सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांनी शासकीय लेखा परीक्षणासाठी सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केले आहे.
खेडमधील सहकार क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून साशंकता निर्माण झाली आहे. सातत्याने सहकारी सोसायट्या, मजूर संस्था, पतसंस्था यांच्या कार्य प्रणालीवर आक्षेप नोंदवत लोकशाही मार्गांनी उपोषणे होत आहेत. त्यातच काही सहकारी संस्था संशयाच्या घेऱ्यात आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक मोहिते यांनी या प्रकरणी सर्वच सहकारी सोसायट्या व पतसंस्था कामकाजाचे शासकीय वैधानिक लेखा परीक्षण करण्याची मागणी लावून धरली आहे.
यांच्या या मागणीला वंचित बहुजन आघाडीचे गिरीश गमरे यांनी पाठिंबा दिला. शुक्रवारी २१ रोजी पूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार मोहिते, गमरे, जाधव यांनी सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान, सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर वैधानिक लेखा परीक्षण प्रक्रियेची माहिती मोरे यांनी दिली.









