ना रिफायनरी, ना अणुउर्जा तरीही आंबा होरपळला… !

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

अणुउर्जा प्रकल्पासंबंधी ज्यापद्धतीने चर्चा झाली तशीच चर्चा रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत करण्यात आली. रिफायनरी प्रकल्प झाला तर कोकणात आंबा, काजू पिकावर त्याचा गंभिर परिणाम होणार. आंबा कलमेच नष्ट होणार. बागायती अस्तित्वाच रहाणार नाहीत. आंबा, काजू पिकावर त्याचा फार मोठा परिणाम होणार अशी चर्चा होती. परंतु गेली तीन-चार वर्षे आंबा, काजू पिक कमालीचे घटले आहे. आंबा, काजू पिक कमी झाले हा ऋतुचक्रातील हवामान बदलामुळे जरी आंबा, काजू पिकावर परिणाम झाला असला तरी मात्र, अणुउर्जा किंवा नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम जरी प्रत्यक्ष सुरू झाले असते तरीही आजच्या या कमी असणाऱ्या आंबा, काजू पिक कमीचे खापर या प्रकल्पांवरच फोडण्यात आले असते.

कोकणात कोणत्याही उद्योगाचे सूतोवाच झाले की विरोध करण्यासाठी काही संघटना पुढे येतात. कोणत्याही येणाऱ्या विकास प्रकल्पांना विरोध करतच राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एकीकडे कोकणात म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन कोणता प्रकल्प उभा रहाण्याविषयी चर्चा सुरू झाली की विरोधाचे फलक बाहेर पडतात. गेल्या चाळीस-पन्नास वर्षात यामुळेच एखाद्या गावातील रस्ता करणेही मुश्किल असते. गावातील सार्वजनिक हित असणारा एखादा रस्ता अडवण्यातही आनंद मानणारी आणि आनंद व्यक्त करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे गावातल्या एखाद्या सार्वजनिक रस्त्याला विरोध करणारी मानसिकता ज्याठिकाणी रूजलेली आहे. तिथे प्रकल्पांना विरोध तर ठरलेलाच आहे. रायगड जिल्ह्यामध्ये काही उद्योग उभे राहू शकले. परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रकल्पाच जरी नाव नुसत कोणी काढल तरी विरोध करणाऱ्या संख्या, संघटना आणि राजकीय पक्ष तर ठरलेलेच आहेत. कोणत्याही उद्योगांना विरोध करताना कोणते निकष लावून विरोध केला जातो याबद्दल इतक्या वर्षांनंतर आजही कोणालाही काही सांगता यायचे नाही. राजकीय पक्षांचे नेते विरोध करतात कारण त्यांना सोईचे राजकारण करता येते. प्रकल्पांना विरोध करून राजकीय ‘इश्यू’ म्हणून वापर करता येतात. त्यामुळे विरोध केला जातो. यातला गंमतीचा भाग म्हणजे ज्या राजकीय पक्षाचे नेते एखाद्या प्रकल्पासंबंधी विरोधाची भुमिका घेऊन उभे रहातात त्या विरोध करणाऱ्यांकडून पाच तरूणांना रोजगार देणारी एखादी संख्याही उभी राहिलेली नाही. त्यामुळे फक्त विरोध करणे त्यावर राजकारण करत रहायचे असा एककलमी कार्यक्रम असतो. विरोध करण्यामागची जी कारण सांगितली जातात की ती इतकी हास्यास्पद असतात, की विचारू नका त्याला कोणतीही तर्क संगतीही नसते. परंतु तरीही इतक्या बेमालूमपणे असत्यावर आधारित पसरविली जातात. दुर्दैवाचा भाग म्हणजे लोकही अशा अफवांवर फार लवकर विश्वास ठेवतात. ही वस्तुस्थिती आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अणुउर्जा प्रकल्प होणार म्हणून चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्याला विरोध करण्यात आला. लोकसभा निवडणुक पुढे होती मग अफवाच अफवा पसरविल्या गेल्या. समुद्रातील मासेच गायब होणार. मुलं जन्माला येताना ती देखिल विचित्र असतील. आंब्याच्या बागायतीच नष्ट होतील. समुद्रातील मासेही आपोआप मरून पडतील. मासेही नष्ट होतील. आंबा, काजू दिसणारच नाहीत. अशी चर्चा इतकी खुमासदारपणे करण्यात आली की ऐकणाऱ्या प्रत्येकालाच अरे आपण ऐकतोय तेच खरं आहे असं वाटायला लागलं. जैतापूर परिसरात तर कितीतरी अफवा पसरविण्यात येत होत्या. आणि विशेष म्हणजे त्यावर समाजातील सर्वच घटकांचा कमालीचा विश्वास होता. शहानिशा करण्यासाठी आणि यातली सत्यता पडताळण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता. त्यामुळे जी काही चर्चा होते त्यावर विश्वास ठेवण्यावरच भर होता. अणुउर्जा प्रकल्पासंबंधी ज्यापद्धतीने चर्चा झाली तशीच चर्चा रिफायनरी प्रकल्पाच्या बाबतीत करण्यात आली. रिफायनरी प्रकल्प झाला तर कोकणात आंबा, काजू पिकावर त्याचा गंभिर परिणाम होणार. आंबा कलमेच नष्ट होणार. बागायती अस्तित्वाच रहाणार नाहीत. आंबा, काजू पिकावर त्याचा फार मोठा परिणाम होणार अशी चर्चा होती. परंतु गेली तीन-चार वर्षे आंबा, काजू पिक कमालीचे घटले आहे. आंबा, काजू पिक कमी झाले हा ऋतुचक्रातील हवामान बदलामुळे जरी आंबा, काजू पिकावर परिणाम झाला असला तरी मात्र, अणुउर्जा किंवा नाणार रिफायनरी प्रकल्पाचे काम जरी प्रत्यक्ष सुरू झाले असते तरीही आजच्या या कमी असणाऱ्या आंबा, काजू पिक कमीचे खापर या प्रकल्पांवरच फोडण्यात आले असते.
आता कोकणातच ही चर्चा होत आहे की यावर्षी आंबा पिक १५ टक्क्यांवर आले आहे. याला कारण काय ? त्याचा शोध तर घेतला जाईलच आताची बागायतदारांची परिस्थिती फारच बिकट बनलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु कित्येकवेळा आपण चुकीच्यापद्धतीने चर्चा करतो आणि चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या चर्चेला बळी पडतो. त्यातली सत्यता वेगळीच असते. रिफायनरी प्रकल्प व्हावा की होऊ नये हा निर्णय स्थानिक ग्रामस्थ आणि शासनाचाच आहे. आम्ही रिफायनरी प्रकल्पाचे समर्थकही नाही. आणि विरोधकही नाही. त्यातली वस्तुस्थितीजन्य चर्चा आता कोकणात होताना दिसते. ‘‘जैतापूर अणुउर्जा प्रकल्प व्होवक नाय की नाणाराक रिफायनरीही नाय’ तरीपण कोकणात यावर्षी आंब्याचा आणि काजूचा पिक कमी कसा झाला. याच्या ‘गजाली’ कानावर येतात. ज्यांना विरोधच करायचा असतो ते लोक कोणत्याही गोष्टीला विरोधच करत असतात.
विरोधाचे आणखी एक उदाहरण सांगता येईल सी वर्ल्ड सारखा स्वप्नवत वाटणारा प्रकल्प मालवण-वायंगणी भागात होणार होता. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री कै.अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री होते. विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या आग्रही भुमिकेने या सी वर्ल्ड प्रकल्पासाठी १०० कोटींची भू संपादनासाठी आर्थिक तरतूद करून घेण्यात आली होती. परंतु केवळ राजकारणासाठी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करण्यात आला. प्रकल्पाची जागा कमी करावीच्या नादात हा कोकणाला वैभव प्राप्त करून देणारा प्रकल्प कागदावरच गुंडाळला गेला. ज्यांनी या सी वर्ल्ड प्रकल्पाच्या विरोधात रान पेटवले त्यांनी त्यापूर्वी आणि त्यानंतर काहीच केले नाही. त्याच गोष्टीचे आश्चर्य वाटते. कोकणातील जनतेने जरूर यासर्व गोष्टींचा कधीतरी शांतपणे विचार करायला हवा. सर्वच प्रकल्पांच्याबाबतीत विरोध करणारे कोण आहेत ते चेहरे एकदा समोर आणले तर समजून येईल की केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठीच विरोध करणारे हे तेच चेहरे असणार आहेत. यामुळेच कोकणात एकही प्रकल्प येत नाही. कोणीही उद्योजक प्रकल्प आणायला तयार नाही. त्याच कारण स्पष्ट आहे विरोध करणारे तेच असतात. ज्यांना काहीच करायच नसत. आपण चांगल काय केलं ? हे सांगू न शकणारेच विरोध करत असतात. हेच स्पष्ट आहे. परंतु यासाठीच कोकणातील सर्वसामान्य जनतेने नेहमी सावध असलं पाहिजे. सर्वच राजकीय नेते, पुढारी राजकारण त्यांच्या-त्यांच्या जागी करतील. परंतु आपल्याला सामान्यात विकासाचाच विचार करावा लागेल.