महाशिवरात्री सोहळ्यानिमित्त श्री बांदेश्वर मंदिरात उद्यापासून विविध कार्यक्रम

चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्री बुधवार २६ फेब्रुवारी रोजी असून मंगळवारी रात्री पालखी सोहळ्याने उत्सवाला आरंभ होईल.

 

यानिमित्त मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १२ श्री बांदेश्वर मंदिराभोवती श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. बुधवार २६ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक होईल. सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत श्री शिवलिलामृत ग्रंथ पारायण होईल. सायं ३.३० ते ८.३० या वेळेत विविध भजनी मंडळांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ९ ते १२ श्रींची मंदिराभोवती सवाद्य पालखी प्रदक्षिणा होईल.

 

गुरुवार २७ फेब्रुवारी रोजी सायं. ४.३० वा. श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील. श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा करून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती करण्यात येईल. रात्रौ ९ वा. श्री देवी भुमिका लोककला दशावतार नाट्यमंडळ यांचा “भक्त शिरोमणी संत कबीर” हा नाट्यप्रयोग सादर होईल.

 

शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भुमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

————-