खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील बोरघर येथील जंगलमय भागात रानडुकराच्या शिकारप्रकरणी अटकेतील दोन्ही संशयितांच्या घरांची दापोली परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील व पथकाने झाडाझडती घेतली. शिकारीसाठी वापरलेल्या फासकीच्या जाळीसह डुक्कर कापण्यासाठी वापरलेला सुरा व कोयताही पथकाने हस्तगत केला.
या दोन्ही संशयितांना रविवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दर सोमवारी वनविभाग कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. शिकार प्रकरणातील पसार झालेल्या.संशयिताचा वनविभागाच्या पथकाकडून शोध जारीच आहे. आणखी काही धागेदोरे पथकाच्या हाती लागल्याचे समजते.
रानडुकराच्या शिकारप्रकरणी अजित नारायण कदम (रा. बोरघर -घोलपवाडी), आकाश बाळकृष्ण पवार (रा. बोरघर – आदिवासीवाडी) या दोघांना वनविभागाने गजाआड केले असले तरी यामध्ये आणखी काहीजणांचा सहभाग असल्याचा संशय वनविभागाच्या पथकाला आहे. वनविभागाच्या पथकाने शनिवारी दोघांनी शिकार केलेल्या ठिकाणांसह डुक्कर कापलेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन्ही संशयितांच्या घरांचीही झाडाझडती घेतली. यापूर्वी वनविभागाच्या पथकाने ७ किलो २०० ग्रॅम वजनाचे मांस जप्त केले होते.
शिकारीसाठी वापरलेली फासकीची जाळी व डुकर कापण्यासाठी वापरलेला कोयता व सुराही वनविभागाच्या हाती लागला आहे. दोन्ही संशयितांची पोलीस कोठडी संपुष्टात आल्याने रविवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रानडुकराच्या शिकारप्रकरणात रॅकेट असण्याच्या शक्यतेने वनविभागाच्या पथकाकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा करत छडा लावण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. शिकार प्रकरणातील पसार झालेल्या संशयिताच्या मागावर वनविभागाचे पथक आहे.











